tussle between Congress-BJP in Latur lok sabha election | लातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना
लातुरात काँग्रेस-भाजपात होणार अटीतटीचा सामना

लातूर : भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या सभेतून वातावरण निर्मिती केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने बैठकांवर भर दिला असून, भाजपने मात्र पदयात्रांसह मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. 

आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी उस्मानाबादला गुंतले आहेत. काँग्रेसला बऱ्याचदा एकाकी झुंज द्यावी लागत आहे. भाजप-शिवसेना मात्र एकदिलाने काम करीत आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख यांचे वर्चस्व आहे. २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असे दोन मतदारसंघ झाले. पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपदही भूषविले. त्यांच्या कार्यकाळात शहराचा झपाट्याने विकास झाला.  त्यामुळे या भागात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, धीरज देशमुख हे प्रचार करीत आहेत. बुथ पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर आदी वर्गांच्या बैठका घेऊन काँग्रेसने केलेल्या कामांवर मते मागत आहेत. मनपात सत्ता नसल्याने काँग्रेसला विरोधकांवर टीका करायला संधी मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची टाऊन हॉलवर सभा घेतली. यातून काँग्रेसने वातावरण निर्मिती केली आहे. 

भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, स्थायीचे सभापती अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे हे नगरसेवकांना घेऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत. कॉर्नर बैठका व पदयात्रांवर भर दिला जात आहे. औसा येथे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेमुळे भाजपामध्ये चैतन्य आले असून, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे स्वत: लातूर शहरातील प्रचार यंत्रणेत सक्रिय आहेत. सध्या लातूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. ७० पैकी ३६ सदस्य भाजपचे आहेत. काँग्रेस ३३ व राष्ट्रवादीचा एक सदस्य निवडून आला आहे. काटावर बहुमत असलेल्या भाजपला महापालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचारात मनपाच्या कामावरही काँग्रेस पदाधिकारी टीका करीत आहेत.

वंचित बहुजन आघाडीने मतांची गोळाबेरीज करीत दलित, मुस्लिम, धनगर आदी समाजाच्या मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एकंदर, लातूर शहराची जनता कोणाच्या पारड्यात माप टाकते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.


Web Title: tussle between Congress-BJP in Latur lok sabha election
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.