विरोधक 'आऊट' करण्याच्या तयारीत, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले 'नॉट आऊट'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:48 IST2026-01-01T17:48:19+5:302026-01-01T17:48:49+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप समोर येईल.

विरोधक 'आऊट' करण्याच्या तयारीत, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले 'नॉट आऊट'!
लातूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बुधवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला. १८ प्रभागांतील ७० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला असून, छाननीदरम्यान काही अर्जांवर घेण्यात आलेले आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत. यामध्ये प्रभाग १२ आणि प्रभाग १० मधील महत्त्वाच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील काँग्रेसचे उमेदवार गोटू यादव यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपच्या डॉ. दीपाताई गीते यांनी आक्षेप घेतला होता. यादव यांच्या घराचे बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा गीते यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सविस्तर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी डॉ. गीते यांचा आक्षेप फेटाळून लावत गोटू यादव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आहे.
तिसऱ्या अपत्याचा आक्षेपही फेटाळला..!
तसाच प्रकार प्रभाग क्रमांक १० मध्येही पाहायला मिळाला. येथील एका उमेदवाराला तिसरे अपत्य असल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचीही सखोल सुनावणी घेतली आणि पुराव्याअभावी किंवा तांत्रिक बाबी तपासून हा आक्षेप निकाली काढला. परिणामी, या उमेदवाराचाही अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरला आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक..!
उमेदवारी मागे घेण्याची तारीख : २ जानेवारी
मतदान : १५ जानेवारी
एकूण प्रभाग : १८
एकूण जागा : ७०
छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप समोर येईल. सध्या तरी आक्षेप फेटाळल्या गेल्याने संबंधित उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.