औसा पालिकेत ऐतिहासिक 'बहिण-भाऊ' पर्व! नगराध्यक्षा बहीणीस उपनगराध्यक्ष भावाची साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:25 IST2026-01-13T17:23:50+5:302026-01-13T17:25:38+5:30
औसा पालिकेत नगराध्यक्ष पदी परवीन शेख तर उपनगराध्यक्ष पदी डॉ. अफसर शेख विराजमान

औसा पालिकेत ऐतिहासिक 'बहिण-भाऊ' पर्व! नगराध्यक्षा बहीणीस उपनगराध्यक्ष भावाची साथ
- महेबूब बक्षी
औसा (जि. लातूर): "बहिणीचा पाठीराखा भाऊ" ही संकल्पना केवळ नात्यापुरती मर्यादित न राहता ती आता औसा शहराच्या विकासाचे केंद्रस्थान बनली आहे. औसा नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी बहिण परवीन शेख आणि उपनगराध्यक्ष पदी भाऊ डॉ. अफसर शेख विराजमान झाले आहेत. मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत ही ऐतिहासिक निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली.
राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २३ पैकी १७ जागा जिंकून पालिकेवर सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मंगळवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. अफसर शेख यांची उपनगराध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, या सभेचे अध्यक्षपद स्वतः नगराध्यक्षा परवीन शेख यांनी भूषवले. यासोबतच हमीद सय्यद आणि जुनेद सय्यद या काका-पुतण्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली, ज्यामुळे पालिकेत अनुभवी आणि तरुण नेतृत्वाचा संगम पाहायला मिळत आहे.
विकासाचा 'बॅकलॉग' भरून काढणार
निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. अफसर शेख म्हणाले, "आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा समतोल विकास साधणार आहोत. स्वच्छता मोहिमेत औशाने देशपातळीवर नाव कमावले आहे, आता महिला आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्राला उभारी देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल." या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करून शहरात मोठा जल्लोष साजरा केला.