'संभाजी पाटलांना चेक बाउन्सचा अनुभव अधिक असावा'; अमित देशमुख यांची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:47 IST2026-01-06T12:46:26+5:302026-01-06T12:47:06+5:30
राज्यातील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) हे सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत

'संभाजी पाटलांना चेक बाउन्सचा अनुभव अधिक असावा'; अमित देशमुख यांची खरमरीत टीका
लातूर : माजी मंत्री आ. संभाजी पाटील यांना चेक बाउन्सचा अनुभव असावा. त्यामुळे ते पुण्याईचा चेक बाउन्स होईल, असे बोलले असतील, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी सोमवारी येथे केली. माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी भाजप बूथ कार्यकर्ता मेळाव्यात विलासराव देशमुख यांच्या पुण्याईचा चेक आता कॅश होणार नाही, तर तो बाउन्स होणार आहे, असे विधान केले होते. त्यावर माजी मंत्री आ. देशमुख यांनी सडेतोड उत्तर देताना चेक कॅश न होण्याचा, तो बाउन्स होण्याचा त्यांना अनुभव असावा, असे म्हटले.
दरम्यान, सोमवारी प्रकाश नगरमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले, विलासराव देशमुख आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्नेहाची आपल्याला कल्पना असून, नेहमीच दोन्ही कुटुंबांमध्ये आदर जपला गेला आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची वैचारिक धार येणाऱ्या काळात अधिक धारधार होईल. युवा नेते सुजात आंबेडकर यांनी जाहीरनाम्यात काही मुद्दे सुचविले आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जावे. यासाठी सुजात आंबेडकर यांच्याशी चर्चा करून रूपरेषा ठरवू.
प्रारंभी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि माजी मंत्री आ. देशमुख यांनी लातूर शहरातील प्रकाशनगरातील नालंदा बौद्ध विहार येथे जाऊन भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सत्ताधारी पाय ओढण्यात व्यस्त...
आमदार देशमुख म्हणाले, राज्यातील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) हे सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या उमेदवारांना पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कार्यकर्त्यांना प्राधान्य : सुजात आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीत मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना, युवकांना प्राधान्य आहे. बहुजनांचे उमेदवार देऊन त्यांना सत्तेत नेण्याचे काम व त्यांना बळ देण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने केले आहे. ते पुढच्या काळातही करू. समाजासोबत गद्दारी करून कमळासोबत जाणाऱ्यांना धडा शिकवा, असेही ते म्हणाले.