मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिका निवडणूक पुढे ढकलली; विरोधकांसह सत्ताधारीही संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:35 IST2025-12-02T19:35:39+5:302025-12-02T19:35:53+5:30
निलंगा नगराध्यक्ष आणि ११ प्रभागातील २३ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते.

मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिका निवडणूक पुढे ढकलली; विरोधकांसह सत्ताधारीही संतप्त
निलंगा (जि. लातूर) : उमेदवारी मागे घेण्यास मुदत न मिळाल्याने रेणापूर पाठोपाठ निलंगा पालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना आता दुबार प्रचार करावा लागणार आहे. दरम्यान, उदगीरमध्येही तीन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया पुढे गेली आहे.
निलंगा नगराध्यक्ष आणि ११ प्रभागातील २३ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते. परंतु, मतदानाच्या १२ तास आधी आयोगाने स्थगितीचा निर्णय कळविल्यानंतर निलंग्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), काँग्रेस तसेच उद्धव सेना, वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी बंद पुकारला आहे.
निवडणूक पुढे ढकलल्याचा आयोगाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मतदान अधिकारावर गदा आणणारी ही कृती लोकशाहीविरोधी असल्याची टीका केली. तर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, आयोगाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकर्ते आणि मतदारांचा हिरमोड झाला आहे.
औसा, अहमदपूर, उदगीरमध्ये मतदान
औसा, अहमदपूर आणि उदगीरमध्ये तीन प्रभागातील तीन जागा वगळता या तीनही नगरपालिकात अध्यक्षपद आणि नगरसेवकांसाठी मंगळवारी मतदान झाले.
नवीन अर्ज भरता येणार नाही
नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार काही प्रभागात नामनिर्देशनपत्र मागे घेण्यापासूनच ही प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे कोणालाही नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत. २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होईल.
खर्चावर पाणी?
मतदानाच्या १२ तास आधी निलंगा पालिकेची निवडणूक पुढे गेली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांच्या झालेल्या खर्चावर एकप्रकारे पाणी पडले आहे. त्यातही खर्च मर्यादा तीच राहील की नव्याने मुभा असलेली खर्च मर्यादा पूर्णपणे वापरता येईल, याबद्दल आयोगाकडून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुढच्या २० दिवसांत आहे त्याच खर्च मर्यादेत प्रचार करायचे म्हटले तर तारेवरची कसरत होणार आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.