Lok Sabha Election 2019 : लातुर लोकसभेसाठी अपक्षांची भाऊगर्दी घटली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 17:51 IST2019-03-30T17:48:14+5:302019-03-30T17:51:15+5:30
यंदाच्या निवडणुकीत अपक्षांनी फारसा रस दाखविला नाही़

Lok Sabha Election 2019 : लातुर लोकसभेसाठी अपक्षांची भाऊगर्दी घटली !
लातूर : लातूर लोकसभेच्या आजवर झालेल्या ११ सार्वत्रिक निवडणुकांपैकी सर्वाधिक २० अपक्ष १९९६ च्या निवडणुकीत लढले़ मतदारांनी अपक्षांना फारसे पाठबळ दिले नाही. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३ जणांनी नशीब आजमावले होते़ त्यांना केवळ ३़१४ टक्के मिळाली़ मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत अपक्षांनी फारसा रस दाखविला नाही़ ४७ जणांनी १४३ अर्ज घेतले होते़ यातून केवळ १५ जणांनीच उमेदवारी दाखल केली होती़ तिघांचे अर्ज बाद झाले तर दोघांनी माघार घेतली आहे़
लोकसभा निवडणुकीत १९९६ पर्यंतच अपक्षांची भाऊगर्दी जास्त होती़ परंतु या मतदारसंघातून मतदारांचे पाठबळ मिळाले नाही़ नऊ निवडणुकीत अपक्षांची दैना उडाली आहे़ आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ७७ अपक्षांनी नशीब आजमावले आहे़ आजवरच्या इतिहासात अॅड़ मनोहरराव गोमारे व एम़एस़ सोनवणे या दोन अपक्षांनीच मतदारसंघात समाधानकारक मते घेत लक्षणीय कामगिरी केली आहे़ त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे़ १९७७ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत केवळ एकच अपक्ष रिंगणात होता़ त्यांना केवळ २ हजार ४९७ मते मिळाली़ १९८० च्या निवडणुकीत सातपैकी चार अपक्ष होते़ यावेळी मात्र अपक्षांच्या मताचा टक्का वाढला असून एकूण मतदानाच्या १९़१२ टक्के (८१, ३३९) मते मिळाली़ यात अपक्ष उमेदवार एम़एस़ सोनवणे यांना ६४ हजार ८१ मते मिळाल्याने अपक्षांचा टक्का वाढला होता
१९८४ च्या निवडणुकीत ९ पैकी ७ उमेदवार अपक्ष होते़ परंतु यात एकालाही ठसा उमटविता आला नाही़ सर्वांना मिळून ३७ हजार ६२० मते पडली होती़ १९८९ ला आठपैकी पाच उमेदवार अपक्ष होते़ यावेळी अपक्षांच्या मताची टक्केवारी चांगलीच घसरली़ केवळ १२ हजार ८४३ मतदारांनीच अपक्षांना पाठबळ दिले़ १९९८ च्या निवडणुकीत ४ अपक्षांनी नशीब आजमावले़ त्यांना फक्त ९ हजार ८०८ मते मिळाली़ ९९ साली झालेल्या निवडणुकीत तीन अपक्षांनी निवडणूक लढविली़ त्यांना ९ हजार १५७ मते मिळाली होती़ २००४ च्या लोकसभा निवडणुकीत ४ अपक्ष होते़ त्यांना २० हजार ७१२ मते मिळाली़ २००९ च्या निवडणुकीतील ५ उमेदवार, २०१४ च्या निवडणुकीत १३ जणांनी निवडणूक लढविली.
अपक्षांत गोमारे यांना लाखांवर मते...
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत ११ अपक्षांनी नशीब आजमावले़ यात समाजवादी नेते अॅड़ मनोहरराव गोमारे यांना १ लाख २३ हजार ५०६ मते मिळाली़ इतर १० अपक्षांचे एकत्रित ११ हजार ५८५ मते मिळाली होती़
यंदाच्या निवडणुकीत संख्या घटली...
गेल्या ११ सार्वत्रिक निवडणुकांत अॅड. मनोहरराव गोमारे यांचा अपवाद वगळता मतदारांनी कोणालाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्षांचे प्रमाण घटले असून, केवळ दोघेजण अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.