भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना त्याच भाषेत उत्तर देणार नाही, तशी लातूरची संस्कृती नाही: अमित देशमुखांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:50 IST2026-01-07T19:48:08+5:302026-01-07T19:50:47+5:30
भाजपाच्या चुकीमुळे जनतेला नाहक त्रास नको. लातूर बंद करू नये.

भाजप नेत्यांच्या वक्तव्यांना त्याच भाषेत उत्तर देणार नाही, तशी लातूरची संस्कृती नाही: अमित देशमुखांचा पलटवार
लातूर : सध्याच्या परिस्थितीत भाजपचे नेते ज्या पद्धतीची वक्तव्ये करीत आहेत, त्यांना त्याच भाषेत उत्तरे दिले जावेत, असे काहीजण सुचवत आहेत. परंतु, तशा संस्कारात आम्ही वाढलो नाही. लातूरची ती संस्कृती नाही. त्या तन्हेने उत्तरे देणार नाही, असे स्पष्ट करीत काँग्रेस नेते माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी थेट उल्लेख टाळत टीका केली आहे.
काँग्रेसच्या प्रचारार्थ साळाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता बैठकीत आ. देशमुख म्हणाले, राजकारणाने खालचा स्तर गाठला आहे. परंतु, लातूरची संस्कृती जपून ठेवण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी. येथील प्रत्येक समाज घटक सकारात्मक आहे. नेते शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांनी शहराचे नेतृत्व केले होते. आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. प्रास्ताविक प्रा. एकनाथ पाटील यांनी केले. यावेळी अॅड. उदय गवारे यांचेही भाषण झाले.
जनतेला त्रास नको, लातूर बंद नको...
रवींद्र चव्हाण यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लातूरकरांनी आज बंदचे आवाहन केल्याचे समजले आहे. परंतु भाजपाच्या चुकीमुळे जनतेला नाहक त्रास नको. लातूर बंद करू नये. येणाऱ्या काळात आपण सुसंस्कृत मार्गाने उत्तर देऊ. जेणेकरून भविष्यात कोणीही विलासराव देशमुख किंवा लातूरकरांचा अवमान करण्याचे धाडस करणार नाही, असे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी म्हटले आहे.