लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कक्षातील पूर्वतयारीची पाहणी

By आशपाक पठाण | Published: May 30, 2024 08:13 PM2024-05-30T20:13:58+5:302024-05-30T20:14:45+5:30

मतमोजणी कक्षाबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केल्या सूचना

Inspection of preparedness of counting room in Latur Lok Sabha Constituency | लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कक्षातील पूर्वतयारीची पाहणी

लातूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कक्षातील पूर्वतयारीची पाहणी

लातूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आढावा घेतला. तसेच मतमोजणी कक्षाची पाहणी करून अनुषंगिक सूचना दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, प्रियांका आयरे, नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शरद झाडके, सुशांत शिंदे, मंजुषा लटपटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षात १४ टेबलवर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी दिवशी अवलंबिण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

बंदोबस्ताचा घेतला आढावा

मतमोजणी कक्ष परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रवेशद्वारावरील तपासणी, मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनिहाय आकडेवारीचे संकलन, टपाली मतमोजणी आदी बाबींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक मुंडे यांनी मतमोजणी कक्षाची आणि परिसराची पाहणी केली. तसेच मतमोजणी दिवशीच्या पोलीस बंदोबस्ताबाबत आढावा घेतला.

मतमोजणी कक्षात मोबाईल नाही

मतमोजणी कक्षात भारत निवडणूक आयोगाने परवानगी दिलेल्या व्यक्तींशिवाय इतर कोणालाही मोबाईल घेवून प्रवेश करण्यास मनाई आहे. त्यामुळे उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी कक्षात मोबाईल घेवून जाता येणार नाही. त्यामुळे प्रवेशद्वारावरच तपासणी करून सर्वांना मतमोजणी कक्ष परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे.

Web Title: Inspection of preparedness of counting room in Latur Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.