लातूरात चार माजी महापौर उतरले निवडणूक रिंगणात; पक्षांतरानंतर चुरस अन् प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:03 IST2026-01-05T13:02:54+5:302026-01-05T13:03:53+5:30
लातूर शहर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

लातूरात चार माजी महापौर उतरले निवडणूक रिंगणात; पक्षांतरानंतर चुरस अन् प्रतिष्ठा पणाला
लातूर : महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजवर पाच महापौर झाले आहेत. त्यापैकी चार जणांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षांतराने चारही माजी महापौरांच्या लढाईत चुरस वाढली असून, सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकमेव माजी महापौर अख्तर मिस्त्री हे निवडणुकीच्या मैदानापासून दूर आहेत.
महापालिकेत पहिल्या महापौर ठरलेल्या प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, ॲड. दीपक सूळ, विक्रांत गोजमगुंडे, सुरेश पवार हे पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. प्रशासकीय कामाच्या अनुभवावर हे उमेदवार मतदारांच्या दारावर जात आहेत. काँग्रेसकडून माजी महापौर स्मिता खानापुरे यांनी प्रभाग १५, माजी महापौर ॲड. दीपक सूळ प्रभाग क्र.१०, राष्ट्रवादी (अजित पवार)कडून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, तर प्रभाग ६ मधून शिंदेसेनेकडून माजी महापौर सुरेश पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. छाननीत सर्वांचेच अर्ज वैध ठरले असून, मैदानात असलेले चौघे मूळ काँग्रेसचे आहेत. त्यात सर्वात आधी सुरेश पवार यांनी भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनंतर आता शिंदेसेना गाठली आहे. तर, विक्रांत गोजमगुंडे यांनी निवडणुकीच्या तोंडावर हात सोडून घड्याळ बांधले आहे. त्यामुळे चारही महापौरांच्या प्रभागातील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.
काँग्रेस विरुद्ध भाजप
लातूर महापालिकेचा सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार असला, तरी काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे राष्ट्रवादीकडून, तर माजी महापौर सुरेश पवार शिंदेसेनेकडून उभे आहेत. दोघांनाही काँग्रेस आणि भाजपच्या तुल्यबळ उमेदवारांचे आव्हान असेल.
कंत्राट आणि विकास
काँग्रेसने प्रचाराच्या प्रारंभालाच कंत्राटदारासाठी भाजपने मनपात योजना आणल्या, असा आरोप केला आहे. सामान्य माणूस नव्हे, तर भाजपसाठी कंत्राटदार केंद्रबिंदू आहे, असा थेट प्रहार माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी केला आहे. त्यावर पलटवार करताना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आ. अमित देशमुख यांनी आमदारकीच्या काळात काय केले हे आधी सांगावे, असे आव्हान दिले आहे. रविवारचा प्रचार अशा आरोप-प्रत्यारोपाने रंगला.