राजकीय कुरघोडी नकोत, प्रभागात विकास कामे काय करणार? मतदारांचा उमेदवारांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:02 IST2026-01-07T20:00:58+5:302026-01-07T20:02:00+5:30
महापालिकेच्या १८ प्रभागातील ७० जागांसाठी ३५९ उमेदवार रिंगणात आहेत. मागील चार दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडत आहे.

राजकीय कुरघोडी नकोत, प्रभागात विकास कामे काय करणार? मतदारांचा उमेदवारांना सवाल
- आशपाक पठाण
लातूर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, गल्लोगल्ली प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे. खांद्यावर पक्षाचा रुमाल, हात जोडून मते मागणारे कार्यकर्ते आणि पोस्टर, बॅनरची गर्दी वाढली आहे. मात्र, प्रचारात विकासकामांपेक्षा तिकीट कसे मिळाले, कोण बाजूला झाले, शेवटी कोणाला संधी मिळाली, याच चर्चा अधिक रंगताना दिसत आहेत. यावर जागरूक मतदार राजकीय कुरघोडी नकोत, विकासाचं उत्तर द्या, आमच्या वॉर्डात काय करणार ते सांगा? असा सवाल करीत आहेत.
महापालिकेच्या १८ प्रभागातील ७० जागांसाठी ३५९ उमेदवार रिंगणात आहेत. मागील चार दिवसांपासून प्रचाराचा धुराळा उडत आहे. महापालिकेचा विस्तार वाढला असला तरी शहरालगतच्या नव्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा अद्याप अपुऱ्या आहेत. कर मात्र नियमित वसूल केला जातो. नळाचे पाणी, रस्ते व गटारी, घंटागाडी, सुरळीत वीजपुरवठा, पथदिवे, अंगणवाडी व रेशन दुकानांची सुविध आदी नागरिकांच्या प्रमुख मागण्या आहेत. नव्या उमेदवारांकडून या समस्या मार्गी लागाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, अनेक उमदेवारांचे कार्यकर्ते अजूनही आपल्याला तिकीट कसे मिळाले, कोणाचे कटले जमेची बाजू यावर चर्चा करीत आहेत. वॉर्डात आलेली प्रचार रॅली पक्षाचे गुणगान गाऊन जात आहे. उमेदवार मतदारांचा आशीर्वाद घेत पुढे जात आहेत. कोणी पथदिव्यांची समस्या, कोणी गटारी, कचरा, रस्त्याची समस्या मांडत असून, त्यावर उमेदवारांचे उत्तर संधी द्या, करून दाखवितो, असेच मिळत आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार असोत की अपक्ष प्रत्येकजण आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची भावना जागरूक मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
पथदिवे बंद पडलेत, ते कधी लागतील...
प्रभागातील पथदिवे बंद पडलेत, रिकाम्या प्लॉटवर कचऱ्याचे ढीग लागतात. दुर्गंधी वाढतेय, रात्रीच्या वेळी रस्त्याने जाताना महिला, मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, यावर काय करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाढीव वसाहतींमध्ये रस्ते, नाल्यांची समस्या मोठी आहे. इथे मात्र उमेदवारांची मतदारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दमछाक होत आहे.
पावसाळ्यात मुलांना शाळेतही जात आलं नाही...
प्रभाग क्रमांक १ व २ मधील काही वाढीव वसाहतीत पावसाळ्यात नागरिकांची धांदल उडाली. चिखलमय रस्त्याने पादचारी सोडा वाहनही पुढे जाणे कठीण झाले होते. तेव्हा चार ब्रास मुरूम टाका म्हणून ओरड केली, पण कुणीही आलं नाही. आता रस्ते पक्के करा, अशी मागणी केली जात आहे.
प्रशासक असल्याने होती अडचण...
मागील तीन वर्षांत मनपात प्रशासक असल्याने इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, प्रमुख पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांनी कितीही ओरड केली तरी प्रशासक सांगतील तेच काम झाले. नागरिकांच्या मागणीवर कामे झाली नाहीत, अशा प्रश्नांना उमेदवार प्रशासक राजवटीत समस्या वाढल्याचे सांगत आहेत.