विलासरावांच्या भाषणांचा 'डिजिटल धमाका'; भाजप नेत्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर लाट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:21 IST2026-01-09T19:19:48+5:302026-01-09T19:21:29+5:30
लातूरकरांमध्ये विलासरावांच्या भाषणांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली असून, सोशल मीडिया 'विलासरावमय' झाला आहे.

विलासरावांच्या भाषणांचा 'डिजिटल धमाका'; भाजप नेत्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर लाट!
लातूर : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने लातूरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, आता सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका विधानानंतर, लातूरकरांमध्ये विलासरावांच्या भाषणांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली असून, सोशल मीडिया 'विलासरावमय' झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी लातुरात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणींबद्दल विधान केले होते. या विधानाचे पडसाद आणखीन उमटत आहेत. या विधानानंतर विलासरावांच्या समर्थकांनी आणि लातूरकर नागरिकांनी त्यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर करायला सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर भाषणांचा महापूर..!
निवडणुकीच्या काळात विलासरावांची गाजलेली भाषणे, त्यांची शैली आणि विकासाच्या मुद्द्यांवरील मांडणी असलेले व्हिडिओ सध्या व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. केवळ विलासरावांचीच नव्हे, तर इतर दिग्गज नेत्यांनी विलासरावांच्या नेतृत्वाचे कौतुक केलेली भाषणेही पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी, कट्ट्यांवर आणि गल्लीबोळांतील चर्चेत आता विलासरावांच्या भाषणांचे आवाज घुमू लागले आहेत. तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या क्लिप आवर्जून ऐकताना दिसत आहेत.
निवडणुकीच्या प्रचारात नवा ट्विस्ट..!
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या स्थानिक प्रश्नांऐवजी विलासरावांचा वारसा आणि त्यांचे कर्तृत्व यावरच चर्चा केंद्रित होताना दिसत आहे. चव्हाण यांच्या एका विधानाने विलासरावांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला असून, याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एकूणच, लातूरच्या राजकीय आखाड्यात प्रत्यक्ष सभांइतकाच आता ''डिजिटल वाॅर'' प्रभावी ठरताना दिसत आहे.