काँग्रेसची चुकीचे धोरणे, ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण; देवेंद्र फडणवीसांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:02 IST2026-01-08T15:00:52+5:302026-01-08T15:02:40+5:30
विलासरावांबद्दल नितांत आदर, मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल

काँग्रेसची चुकीचे धोरणे, ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण; देवेंद्र फडणवीसांची टीका
लातूर : काँग्रेसच्या ७० वर्षांच्या दुर्लक्षामुळे शहरांचे बकालीकरण झाले. परंतु भाजपचे सरकार आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेवर विशेष भर देत शहरांचा विकास साधल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. दरम्यान, लातुरात भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भाने डॅमेज कंट्रोल करीत मुख्यमंत्र्यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचा पुनरुच्चार केला.
लातूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठी ५० हजार कोटी मिळाले आहेत. यातून भुयारी गटारी, घनकचरा व्यवस्थापन अशी कामे हाती घेण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणात पैसा दिला आहे. लातूर शहर घनकचरा व्यवस्थापनात मॉडेल शहर होईल, असे ते म्हणाले. मंचावर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी आ. शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आ. पाशा पटेल, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर उपस्थित होते.
लातूर- मुंबई पाच तासांत, औद्योगिकीकरणाला वेग
समृद्धी महामार्ग ज्या ज्या जिल्ह्यांतून गेला आहे, तिथे कारखानदारी वाढली आहे. लातूर-कल्याण महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबईचे अंतर पाच तासांवर येईल. ज्यामुळे लातूरमध्ये औद्योगिकीकरणात वाढ होईल. लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये मेट्रो आणि वंदे भारत ट्रेनची निर्मिती लवकरच होणार आहे. या फॅक्टरीचे काम प्रगतिपथावर असून, १० हजार स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
लातूर नेतृत्वाची भूमी, विलासरावांबद्दल आदर
लातूरच्या भूमीत नेतृत्व तयार करण्याचे गुण आहेत. या भूमीनेच देशाला शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांच्यासारखे कर्तबगार नेते दिले आहेत. माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी आहे, अशा शब्दांत तत्कालीन नेतृत्वाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून चुकीचे शब्द गेल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले, विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्र्राच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे त्यांचे नेतृत्व होते. आमची लढाई काँग्रेससोबत असली तरी आदर प्रकट करताना मला कसलाही संकोच नाही.