लातुर महानगरपालिकेत काँग्रेस-भाजपात थेट लढत; कमळ फुलणार की, हातच भारी ठरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:16 IST2026-01-12T14:13:26+5:302026-01-12T14:16:06+5:30
महानगरपालिका रणसंग्राम : काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख आणि भाजपाचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लातुर महानगरपालिकेत काँग्रेस-भाजपात थेट लढत; कमळ फुलणार की, हातच भारी ठरणार?
राजकुमार जाेंधळे
लातूर : थंडीचा कडाका वाढत असतानाच लातूर महानगरपालिकेच्या राजकीय आखाड्यात मात्र प्रचाराने उष्मा वाढला आहे. ‘काय म्हणतंय लातूर?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. प्रामुख्याने काँग्रेसचे मात्री मंत्री आ. अमित देशमुख, भाजपाचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
थेट लढतीला काही ठिकाणी राष्ट्रवादीची फाेडणी
लातूरचा राजकीय इतिहास पाहता येथे प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपा यांच्यातच पारंपरिक लढत राहिली आहे. मात्र, यंदाचे चित्र थोडे वेगळे आहे.
काँग्रेस-वंचित युती : माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूर शहरावरील आपली पकड कायम राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साेबत घेतले आहे. सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन ‘हात’ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे.
भाजपाची रणनीती : माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ‘विकासा’चा अजेंडा समोर ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला विकासाचा राेड मॅप सांगत, लातूरचा कायापालट करण्याचे आश्वासन देत ‘कमळ’ फुलवण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
राष्ट्रवादी म्हणते, आमच्याशिवाय सत्ता नाही : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र चूल मांडली आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय सत्ता स्थापता येणार नाही, असे सांगितले आहे.
मनपा निवडणुकीत मुख्य कळीचे मुद्दे
निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने लातूर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आणि ड्रेनेज लाईन या मूलभूत सुविधांवरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. काँग्रेस ‘लातूरच्या अस्मिते’चा मुद्दा उचलत आहे, तर भाजपा ‘ट्रीपल इंजिन’ सरकारचे फायदे सांगत मतदारांना आकर्षित करत आहे.
नेत्याची लागली ‘प्रतिष्ठा’ पणाला
माजी मंत्री आ. अमित देशमुख यांना आपला गड राखण्याचे आव्हान आहे. तर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकरांना भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. राष्ट्रवादीचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसाेडे, आ. विक्रम काळे यांना राष्ट्रवादीची लातुरातील जागा कायम ठेवायची आहे.