‘क्रॉस व्होटिंग’च्या भीतीने उमेदवारांची झोप उडाली; ‘पॅनल टू पॅनल’’ मतदानासाठी ‘फिल्डिंग’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:07 IST2026-01-13T12:06:07+5:302026-01-13T12:07:39+5:30
उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांकडून शड्डू ठोकल्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

‘क्रॉस व्होटिंग’च्या भीतीने उमेदवारांची झोप उडाली; ‘पॅनल टू पॅनल’’ मतदानासाठी ‘फिल्डिंग’!
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, १८ प्रभागांतील ७० जागांसाठी तब्बल ३५९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मात्र, यावेळेस प्रमुख राजकीय पक्षांना बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांच्या फौजेने मोठ्या संकटात टाकले आहे. अनेक प्रभागांमध्ये ‘क्रॉस व्होटिंग’ होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये तिकीट वाटपावरून मोठी नाराजी पाहायला मिळाली. उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा इतर पक्षांकडून शड्डू ठोकल्यामुळे अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे मतदार एकाच पॅनलला मतदान न करता वेगवेगळ्या उमेदवारांना पसंती देतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
‘पॅनल टू पॅनल’ मतदानासाठी नेत्यांची फिल्डिंग
मतदारांनी विखुरलेले मतदान न करता संपूर्ण पॅनलला मतदान करावे, यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आता कंबर कसली आहे. प्रमुख नेत्यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढण्यावर भर दिला आहे. पदाधिकारीही ‘क्रॉस व्होटिंग’चा धोका टाळण्यासाठी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. एकूण १८ प्रभागांपैकी ७ ते ८ प्रभागांमध्ये ही भीती सर्वाधिक आहे, जिथे अपक्ष उमेदवार प्रबळ मानले जात आहेत.
मतदारांचा कौल कोणाकडे?
प्रचाराच्या तोफा धडाडत असताना, मतदारांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. स्थानिक विकासकामे, दिलेली आश्वासने आणि उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क यावर मतदान होणार की पक्षीय निष्ठेला महत्त्व दिले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बंडखोरांमुळे होणारे मतांचे विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरणार आणि लातूरचा ‘गड’ कोण सर करणार, याचा फैसला आता मतदारांच्या हातात आहे.
प्रभागनिहाय उमेदवार
एकूण प्रभाग- १८, उमेदवार- ३५९
१ - २१, २- ३२, ३- ३३, ४- २४, ५- १८
६- २०, ७- २२, ८- २०, ९- १८, १०- १४
११- १०, १२- १९, १३- २३, १४- २१, १५- १६
१७- ११, १८- १४