लातूरमध्ये काँग्रेस-भाजपत नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी! आता पक्षाच्या प्रचारात दिसतील का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:30 IST2026-01-06T15:25:10+5:302026-01-06T15:30:03+5:30
महापालिका निवडणूक : अधिकृत उमेदवारांना फटका बसू नये म्हणून काळजी

लातूरमध्ये काँग्रेस-भाजपत नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी! आता पक्षाच्या प्रचारात दिसतील का?
आशपाक पठाण
लातूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपामुळे काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षांतर्गत मतभेद कमी करण्यासाठी व्यापक स्तरावर मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. या हालचालींमुळे निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षांमध्ये एकजूट साधण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत.
काँग्रेस पक्षात उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार व पक्ष निरीक्षकांची सोमवारी बैठक पार पडली. यावेळी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी नाराज कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महापालिकेच्या निवडणुकीत जागा मर्यादित असून, इच्छुकांची संख्या मोठी आहे. अनेक प्रभागांत एकाच जागेसाठी चार ते पाच जण इच्छुक होते. त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र, याचा अर्थ संबंधित कार्यकर्त्यांचे योगदान कमी लेखले जात नाही, असे सांगत भविष्यात पक्षाकडून अधिक मोठी जबाबदारी देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच पक्षशिस्त आणि संघटनात्मक ताकद यावर भर देत नाराज पदाधिकाऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले. या बैठकीनंतर काँग्रेसमधील नाराजी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपच्या त्या २८ जणांच्या भूमिकेकडे लक्ष...
दरम्यान, भाजपमध्येही उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी शांत करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इच्छुक व नाराज पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन त्यांची समजूत काढली. निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसू नये, यासाठी बंडखोर उमेदवारांवर कारवाईचे संकेत देतानाच त्यांना माघार घेण्यासाठी सूचना दिल्या जात असल्याची माहिती आहे. भाजपमध्ये काही प्रभागांत अद्याप बंडखोरीचे सावट कायम असून, सुमारे २८ इच्छुकांनी निवडणुकीत शड्डू ठोकल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सातत्याने संपर्क साधून नाराजांची मनधरणी करत आहेत.
आता प्रचारात सक्रिय होतील का ?
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये तिकीट न मिळाल्याने काही काळ नाराज असलेले इच्छुक आता नेत्यांच्या समजूत काढण्याच्या प्रयत्नांनंतर पुन्हा सक्रिय होतील का, की निवडणुकीपासून दूर राहतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे लातूर महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत संघर्ष कमी होऊन प्रचाराला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.