लातूर मनपासाठी तांत्रिक कारणांमुळे ६३ अर्ज बाद; रिंगणात राहिलेल्या ६९६ उमेदवारांत चुरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:28 IST2026-01-01T16:27:52+5:302026-01-01T16:28:02+5:30
या छाननी प्रक्रियेत प्रभाग १३, १४ आणि १५ च्या समूहात सर्वाधिक म्हणजे २७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.

लातूर मनपासाठी तांत्रिक कारणांमुळे ६३ अर्ज बाद; रिंगणात राहिलेल्या ६९६ उमेदवारांत चुरस
लातूर : महानगरपालिकेच्या १८ प्रभागांतील ७० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया आता खऱ्या अर्थाने रंगू लागली आहे. बुधवारी झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये मोठा निर्णय झाला असून, एकूण ७५९ अर्जापैकी ६९६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, तर तांत्रिक कारणांमुळे ६३ अर्ज बाद करण्यात आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीनंतर प्रभागनिहाय आकडेवारी स्पष्ट झाली आहे. प्रभाग १, २ व ३ मध्ये एकूण १७३ अर्जापैकी १५९ अर्ज वैध ठरले असून ११ अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग ४, ५ व ६ मध्ये ११४ पैकी १०८ अर्ज वैध तर ६ अर्ज बाद झाले. प्रभाग ७, ८ व ९ मध्ये १२१ अर्जापैकी ११३ वैध आणि ८ अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग १३, १४ व १५ मध्ये सर्वाधिक पेच पाहायला मिळाला असून, येथे १५३ अर्जापैकी १२६ अर्ज वैध ठरले, तर तब्बल २७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. प्रभाग १६, १७ व १८ मध्ये १०४ अर्जापैकी ९६ अर्ज वैध असून ८ अर्ज अवैध ठरले आहेत.
सुनावणी; छाननी प्रक्रियेदरम्यान प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील तीन उमेदवारी अर्जावर काही गंभीर हरकती आणि आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या अर्जावरील निर्णय राखून ठेवला असून, यावर गुरुवारी विशेष सुनावणी होणार आहे. त्यानंतर या प्रभागांतील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. सुनावणीनंतरच प्रभाग २ चे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
रिंगणात राहिलेल्या उमेदवारांमध्ये चुरस..!
या छाननी प्रक्रियेत प्रभाग १३, १४ आणि १५ च्या समूहात सर्वाधिक म्हणजे २७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाल्यामुळे अनेक इच्छुकांची निवडणूक लढवण्याची संधी हुकली आहे.
२ आता रिंगणात राहिलेल्या उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार असून, अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र आणि खऱ्या लढती स्पष्ट होतील. दरम्यान, आक्षेपांमुळे उमेदवारी अर्जाची पूर्ण छाननी होऊ शकलेली नाही.