Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:22 IST2025-10-18T16:21:48+5:302025-10-18T16:22:20+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

Kolhapur: कागलमध्येही मतदार यादीत घोळ, अधिकाऱ्यांवर कारवाई करा; समरजीत घाटगे यांची मागणी
कोल्हापूर : कागल नगर परिषदेतील प्रभागांच्या प्रारूप मतदार यादीत ३४२ मतदारांची नावे गायब, ८२२ नावे दुबार, ४५८ मयत मतदार नावे वगळली नाहीत, एकाच घरात अनेक नावे , काही बूथवर वाढ झालेल्या मतदारांची नोंद, प्रभाग क्रमांक ११ व ९ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवार दिलेले नाहीत, अशा अनेक गंभीर त्रुटी आहेत. तरी कामचुकार बीएलओंसह मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करा, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नवीन मतदार यादी प्रसिद्ध करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. याविषयी न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समरजीत घाटगे म्हणाले, प्रभागानुसार प्रसिद्ध मतदार यादीत प्रभाग क्रमांक दहामधील ३४२ मतदारांची नावे दिसत नाहीत. ती नावे इतर कोणत्याही प्रभागात दिसून येत नाहीत. शहरामध्ये २८ हजार ४१३ इतके मतदार आहेत. एक ते अकरा या प्रभागातील मतदार यादीत ८२२ नावे दुबार आहेत. सर्व प्रभागांमधील मयत ४५८ व्यक्तींची नावे वगळलेली नाहीत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये एकाच घरात तब्बल ३६ मतदारांची नोंद दिसते.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये ३ उमेदवार असून, २ हजार ३८८ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ९ हा दोन उमेदवारांचा असूनही मतदार संख्या ३७९२ इतकी आहे. प्रभागाच्या लोकसंख्येत इतकी तफावत कशी? प्रभाग क्रमांक दोनच्या प्रारूप मतदार यादीत २४९५,२४९८,२५०० आणि २५०३ या चार अनुक्रमांकवर एकाच व्यक्तीचे नाव आहे. व्यक्ती एकच असून, मतदान ओळखपत्र वेगवेगळे आहेत. या चुका निवडणुकीपूर्वी दुरुस्त करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शाहूचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, गोकुळचे माजी संचालक अजितसिंह घाटगे, राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब हुच्चे, माजी उपनगराध्यक्ष संजय कदम,आनंदा पसारे, मारुती मदारे, आप्पासाहेब भोसले, नंदकुमार माळकर, राजे बँकेचे संचालक रणजीत पाटील, अरुण गुरव, प्रवीण कुराडे, आदी उपस्थित होते.