Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:01 IST2025-07-04T17:00:09+5:302025-07-04T17:01:22+5:30
गडहिंग्लज विभागातूनही संतप्त प्रतिक्रिया

Kolhapur: चंदगडमध्ये शक्तिपीठाची मागणी बालिश!, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीला विविध पक्ष-संघटनांची हरकत
राम मगदूम
गडहिंग्लज : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गातचंदगड मतदारसंघाचा समावेश करण्याची मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. मात्र, नियोजित महामार्गात गडहिंग्लज व चंदगडचा समावेश नसतानाही त्यांनी केलेल्या अव्यवहार्य मागणीबद्दल गडहिंग्लज विभागातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या प्रस्तावाला विविध पक्ष-संघटनांची हरकत घेतली आहे.
चार मार्ग सुचविले
आमदार शिवाजीराव पाटील यांनी गडहिंग्लज विभागातून चार मार्ग सूचवले असून कोणत्याही एका मार्गाचा शक्तीपीठ महामार्गात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. यामुळे पर्यटनवाढीस चालना मिळून रोजगार निर्मिती होईल आणि पोल्ट्री व भाजीपाला उत्पादकांनाही त्याचा लाभ होईल, असा त्यांचा दावा आहे.
वाचा- शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर चंदगडमधून मार्ग जाण्यास हरकत काय - मंत्री मुश्रीफ
- संकेश्वर-हिटणी-सामानगड-मासेवाडी-वाघराळी-सांबरे- मुगळी-नागनवाडी-आसगाव-कोरज-कोकरे-जांबरे-इसापूर-पारगड मार्गे गोवा.
- संकेश्वर-हिटणी-सामानगड-मासेवाडी-वाघराळी-सांबरे-मुगळी-वरगाव-गुडेवाडी-हल्लारवाडी-नांदवडे-मोटणवाडी फाटा ते गोवा.
- पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामागार्पासून राजगोळी खुर्द- किटवाड-होसूर-बुक्कीहाळ-महिपाळगड-देवरवाडी-शिनोळी-ढेकोळी-तुडये-म्हाळुंगे-कोलिक-
- कणकुंबी-गोवा.
- गारगोटी-पिंपळगाव-मडिलगे-आजरा-चितळे-इब्राहीमपूर- नागनवाडी-आसगाव-कोकरे-जांबरे-इसापूर ते गोवा.
चंदगड तालुका हा कर्नाटक, गोवा व सिंधुदूर्गला जोडणारा दुवा आहे. अलिकडेच पुणा-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा ‘संकेश्वर-बांदा’ महामार्गही झाला आहे. याशिवाय अनमोड, चोरला, तिलारी व आंबोली हे चारही रस्ते गोव्याला जोडतात. त्यामुळे गोव्याला जोडणाऱ्या नव्या रस्त्याची गरज नाही. मूळात शक्तीपीठालाच आपला ठाम विरोध असून गडहिंग्लज विभागातून शक्तीपीठाची मागणी अनैसर्गिक, अव्यवहार्य व चुकीची आहे. त्याला आपण ताकदीनिशी विरोध केला जाईल. - नितीन पाटील, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, महाराष्ट्र
चंदगड विधानसभा मतदारसंघात कुठलेही शक्तीपीठ नाही. जिल्ह्यात अन्यत्र विरोध होत असल्याने ‘चंदगड’वर शक्तीपीठ लादण्याचा प्रयत्न करू नये. चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शेतकरी अल्प-भूधारक आहेत. त्यांना भूमीहिन करू नको. स्थानिक रस्त्यांचे जाळे मजबूत करून दळणवळणाची सोय करावी. गडहिंग्लज विभागाला ‘शक्तीपीठ’ नको, रेल्वेमार्गाची गरज आहे. - प्रा. सुनिल शिंत्रे, जिल्हाप्रमुख उद्धवसेना कोल्हापूर.
शासनाचे नियोजन व लोकांची मागणीदेखील नसताना ‘चंदगड’मधून शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास का? केवळ सरकारला समर्थन देण्यासाठी चुकीची मागणी नको. शक्तीपीठाला राज्यभरातून का विरोध होतोय त्याची माहिती घ्यावी. केवळ महाराष्ट्राच्या हद्दीतून जाणारा हा मार्ग कर्नाटकातून कसा नेता येईल. अल्प भू-धारक व कष्टकरी शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा मार्ग गडहिंग्लज विभागातून जावू देणार नाही. - विद्याधर गुरबे, सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस कमिटी, कोल्हापूर.
शक्तीपीठ महामार्ग गडहिंग्लज विभागातून नेण्याची मागणी अव्यवहार्य असून केवळ आमदारांच्या मनातील मागणी आहे. ही लोकांच्या मनातील मागणी नाही, त्यात जनतेला विश्वासात घेतलेले नाही. आमदारांनी सूचवलेले चारही मार्ग पिकाऊ जमिनीतूनच जातात. त्याशिवाय सह्याद्रीच्या घाटातून गोव्यातून उतरताना पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्रातून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच पर्यावरणवादी कार्यकर्तेही त्याला नक्कीच विरोध करतील. - कॉ. संपत देसाई, कार्याध्यक्ष, श्रमीक मुक्ती दल, महाराष्ट्र
‘शक्तीपीठ’साठी आमदारांनी केलेली मागणी वस्तूस्थितीला धरून नाही. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अवाजवी व अवास्तव मागणी केली आहे. त्यांनी सूचविलेल्या मार्गामुळे हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी या नद्यांच्या महापुराचे नवे संकट उभे राहिल. मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी केलेली चुकीची मागणी जनता मान्य करणार नाही. - राजेंद्र गड्यान्नावर, राज्यसचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र.
लोकप्रतिनिधींनी लोकभावना, लोकांची मागणी व परिणामांचा विचार करून शासनाकडे मागणी करायला हवी. राज्यातील १२ जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा विरोध असणाऱ्या शक्तीपीठाचे आपल्या मतदारसंघात निष्कारण स्वागत करणे म्हणजे ‘आओ बैल मुझे मारो’ असाच प्रकार आहे. - अमर चव्हाण, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, गडहिंग्लज.