सोशल अस्त्र ठरले घातक, मतदारांत दुफळी माजविण्याचा टोकाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:35 IST2019-04-25T11:34:10+5:302019-04-25T11:35:38+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघांत सोशल मीडिया हे अस्त्र मोठ्या प्रमाणावर घातक ठरले आहे. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत अक्षरश: या माध्यमाने धुमाकूळ घातला. जात, धर्मापासून ते पाठिंब्याचे पत्र देण्यापर्यंतच्या क्लिप्स व्हायरल करून, मतदारांत जाणीवपूर्वक संभ्रम माजवून त्यांच्यात दुफळी माजविण्याचे प्रयत्न झाले. आॅनलाईन निरोपांनी मतांची फिरवाफिरवीही मोठ्या प्रमाणावर झाली. आता या अस्त्राने कुणाचा वेध घेतला आहे, हे महिन्याभराने निकालादिवशीच कळणार आहे.

सोशल अस्त्र ठरले घातक, मतदारांत दुफळी माजविण्याचा टोकाचा प्रयत्न
कोल्हापूर : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघांत सोशल मीडिया हे अस्त्र मोठ्या प्रमाणावर घातक ठरले आहे. जाहीर प्रचाराची सांगता झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत अक्षरश: या माध्यमाने धुमाकूळ घातला. जात, धर्मापासून ते पाठिंब्याचे पत्र देण्यापर्यंतच्या क्लिप्स व्हायरल करून, मतदारांत जाणीवपूर्वक संभ्रम माजवून त्यांच्यात दुफळी माजविण्याचे प्रयत्न झाले. आॅनलाईन निरोपांनी मतांची फिरवाफिरवीही मोठ्या प्रमाणावर झाली. आता या अस्त्राने कुणाचा वेध घेतला आहे, हे महिन्याभराने निकालादिवशीच कळणार आहे.
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपासून देशभर सोशल मीडियाचा प्रचारात खुबीने वापर करून घेण्यास सुरुवात झाली होती. सध्या सुरू असलेल्या या तंत्राने संपूर्ण प्रचार यंत्रणाच आपल्या ताब्यात घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांत तर जाहीर प्रचारापेक्षा सोशल मीडियावरील प्रचाराचाच जास्त जोर राहिला. चारीही प्रमुख उमेदवारांनी सोशल वॉर रूम स्थापन करून एकमेकांना पट्ट्यात घेण्याची एकही संधी सोडली नाही. जाहीर सभांपेक्षा या माध्यमाने मतदारसंघात मोठी लाट तयार केली.
उमेदवारांनी हायटेक साधनांचा वापर करीत प्रचार यंत्रणा राबवून वातावरण निर्मिती केली तरी प्रत्यक्ष मतदानादिवशी आणि त्याच्या आदल्या रात्री या माध्यमाने बरीच खळबळ उडवून दिली. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गोटातील नेत्यांचा पाठिंबा आपल्याला आहे, मते फिरवा म्हणून निरोप आला आहे, अमुक एकाला मतदान करायचे नाही, अशा अनेक वावड्या क्लिप्सच्या माध्यमातून फिरविल्या गेल्या.
प्रचार यंत्रणा कितीही हायटेक झाली तरी मतदानाच्या बाबतीत अजूनही पारंपरिक मानसिकताच दिसते. त्यामुळेच नेत्यांच्या शब्दाला अजूनही किंमत आहे. गावागावांत, पेठांतही प्रमुख नेता म्हणेल त्यालाच मतदान करण्याची परंपरा अजूनही कायम आहे. घरातही कुटुंबप्रमुख म्हणेल त्यालाच मतदान होते. त्यामुळे नेते, कुटुंबप्रमुखांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम मतदानाच्या आदल्या रात्री फिरलेल्या क्लिप्सनी केले. त्याचा प्रभाव मतदानादिवशी दिसत होता. लोकही या रात्रीत आलेल्या आॅनलाईन निरोपांची गटागटांनी बसून चर्चा करताना दिसत होते.
बैठकांची जागा घेतली मोबाईलने
आतापर्यंत मतदानादिवशी कुठल्या नेत्यांसोबत बैठकांची खलबते झाली, कोणाचे निरोप आले यावरून चर्चा झडायच्या. या निवडणुकीत मात्र आपल्या मोबाईलवर काय संदेश आला आहे, याचीच चर्चा सर्वच वयोमानाच्या मतदारांमध्ये होताना दिसत होती. मोबाईलवरून संदेश धाडले गेले.
आमचं ठरलंय, ते सोईने मतदान करा!
कोल्हापूर मतदारसंघात आमचं ठरलंय, ठरवलं तेच केलंय अशा आशयाच्या संदेशांनी सर्वांच्या मोबाईलवर धुमाकूळ घातला. पाठिंब्याच्या पत्रावरूनही मतदारांना चकविण्याचे काम केले गेले. ‘सोईने मतदान करा,’ असे सांगणाऱ्या क्लिप्सनी मतदारांमध्ये गोंधळ माजविला. नेत्यांनी याचा इन्कार केला तरी लोकांमध्ये हवा तो संदेश पोहोचविला गेला. हातकणंगले मतदारसंघात तर क्लिप्सचा धुमाकूळच माजला होता. शिरोळ, हातकणंगले, इस्लामपूर, वाळवा येथे नेत्यांच्या रात्रीत फिरलेल्या संदेशांनी संपूर्ण मतदारसंघाचेच चित्र बदलून टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. जात आणि समाजामध्ये वर्चस्वावरून क्लिप्स व्हायरल करून जातीय धु्रवीकरणही मोठ्या प्रमाणावर केले गेले.