Shiv Sena's candidates Chandrakant Patil | Maharashtra Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवारांचे चंद्रकांत पाटील यांना साकडे

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या उमेदवारांचे चंद्रकांत पाटील यांना साकडे

ठळक मुद्देशिवसेनेच्या उमेदवारांचे चंद्रकांत पाटील यांना साकडेभाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये आठ ठिकाणच्या शिवसेना उमेदवारांनी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले असून, प्रत्येक मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची विनंती केली आहे. यातील काहींनी फोनवरून पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, माघारीपर्यंत प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्ह्यातील सहा विद्यमान शिवसेना आमदारांपैकी राजेश क्षीरसागर आणि पाटील यांच्यामध्ये सर्वाधिक राजकीय चकमक उडाली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये भाजप आणि क्षीरसागर समर्थक यांच्यामध्ये जोरदार आरोप, प्रत्यारोप होऊन पत्रकबाजी झाली आहे. क्षीरसागर वगळता अन्य कोणत्याही आमदाराने पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याशी फार पंगा घेण्याचा प्रयत्न केला नाही.

उलट चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर यांनी पाटील यांच्या ‘गुडबुक’मध्ये जाऊन निधीही मिळवून आणला. या पार्श्वभूमीवर आता या सहाही विद्यमान आमदारांना आणि कागलचे संजय घाटगे, चंदगडचे संग्रामसिंह कुपेकर यांनाही पाटील यांच्यासह भाजप नेते कार्यकर्त्यांच्या पाठबळाची गरज भासणार आहे.

 चंदगड, शिरोळमध्ये भाजपचे नेते नाराज असून, कागलमधून समरजितसिंह घाटगे बंडाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच शिवसेना उमेदवार आता चंद्रकांत पाटील यांनी युतीचे शिल्पकार म्हणून जे काम केले, त्यानुसार आपल्या मतदारसंघातील भाजपचे नेते, कार्यकर्त्यांना आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

आबिटकर यांनी घेतली पाटील यांची भेट

प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. पाटील हे सुरेश हाळवणकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी हेलिकॉप्टरने दुपारी चिप्री येथे आले होते. तेथेच आबिटकर यांनी पाटील यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली.

कुपेकरांचा अर्ज भरताना भाजप तालुकाध्यक्ष अनुपस्थित

चंदगड विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या अर्ज दाखल करताना किमान दाखवण्यासाठी का असेना भाजपचे गडहिंग्लज, आजरा, चंदगडचे तालुकाध्यक्ष उपस्थित असणे आवश्यक होते. मात्र हे तिघेही यावेळी उपस्थित नसल्याने युतीच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
 

 

Web Title: Shiv Sena's candidates Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.