Kolhapur Municipal Corporation Election: इच्छुकांच्या सुरु झाल्या गाठीभेटी, चर्चा, वाढदिवस अन् लग्न समारंभास उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:42 IST2025-12-02T18:42:16+5:302025-12-02T18:42:41+5:30
परिचय पत्रके वाटली

Kolhapur Municipal Corporation Election: इच्छुकांच्या सुरु झाल्या गाठीभेटी, चर्चा, वाढदिवस अन् लग्न समारंभास उपस्थिती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणूक केव्हाही जाहीर होईल, या अपेक्षेने इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच प्रमुख व्यक्तींबराेबर बैठका, चर्चा, लग्न समारंभ, वाढदिवस, अंत्यसंस्कार यासारख्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावण्यास सुरुवात केली आहे. समाजमाध्यम, पत्रके यांच्या माध्यमातून संपर्क अभियान राबविले जाऊ लागले आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पाठोपाठ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही ३१ जानेवारीच्या आत या सर्व निवडणुकांचे कार्यक्रम आटोपण्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरीस जिल्हा परिषद, पंचायत समिती, पंचायत समिती आणि जानेवारीच्या २५ तारखेपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील या अपेक्षेने सगळेच आता कामाला लागले आहेत. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी चिन्हासह प्रचार करण्यास अवघे काही दिवसच मिळाले आहेत. अन्य निवडणुकीतही प्रचाराला कमी दिवस मिळणार असल्याने उमेदवारांनी प्रचार सुरूच केला आहे.
महापालिकेचे प्रभाग निश्चित झाले, प्रभागाच्या सीमा स्पष्ट झाल्या, प्रभागावरील आरक्षणही जाहीर झाले. त्यामुळे निवडणूक कशी होणार, हेही चित्र आता स्पष्ट झाले आहे. फक्त पक्षीय उमेदवारी जाहीर व्हायची बाकी आहे, तरीही पक्षाची उमेदवारी आपणाला किंवा आपल्या पत्नीस मिळणार, हे गृहीत धरूनच प्रचार सुरू झाला आहे.
परिचय पत्रके वाटली
चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्यामुळे सगळ्याच इच्छुक उमेदवारांना मतदारांची ओळख काढतच त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागत आहेत. काही ठरावीक अपवाद सोडले तर सगळ्याच प्रभागांत मतदार आणि इच्छुक उमेदवारही नवीनच असल्याने संपर्क कसा आणि कोठून करायचा, असा प्रश्न होता. आधी प्रभागात उमेदवारांचे होर्डिंग झळकले. आता परिचय पत्रके वाटली जात आहेत.
‘दादा, मामा, ताई, वहिनी’ म्हणत गाठीभेटी
काहींनी तर ‘दादा, मामा, ताई, वहिनी’ करत मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. प्रभागात कोणाचे लग्न असेल तर आवर्जून बुके घेऊन उमेदवार हजर राहताना दिसत आहेत. कोणी मयत झाले असल्यास त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली जात आहे. काही जणांनी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याशी चर्चा, बैठका सुरू केल्या आहेत. मंडळातील एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल तर त्यास उपस्थिती लावून इच्छुक उमेदवार जवळीक साधत आहेत.