कोल्हापूर जिल्ह्यात आठ हजारांवर गणेश मंडळांपैकी केवळ ८० मंडळांकडून अधिकृत वीजजोडणी
By भीमगोंड देसाई | Updated: August 29, 2025 18:20 IST2025-08-29T18:19:22+5:302025-08-29T18:20:32+5:30
गणेशोत्सव आनंददायी, निर्विघ्न पार पडण्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

संग्रहित छाया
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शहर, जिल्ह्यातील दहा हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप, रोषणाई, होर्डिंगसाठी अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचे समोर आले आहे. केवळ ८० मंडळांनीच महावितरण प्रशासनाकडून अधिकृत वीज जोडणी करून घेतली आहे. अनधिकृत वीज जोडणीत धोका असल्याने संबंधित मंडळांनी गणेशोत्सव आनंददायी, निर्विघ्न पार पडण्यासाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी करून घ्यावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून केले आहे.
शहरातआणि जिल्ह्यात ८,५०० हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. मात्र बुधवारअखेर फक्त ८० मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. उर्वरित मंडळांनी जवळपासच्या घरातून, विजेच्या खांबावरून वीजजोडणी करून घेतली आहे.
व्यावसायिक दराने वीजबिलाची आकारणी होईल, म्हणून अनधिकृत वीजजोडणी करण्याकडे कल अधिक असतो. पण यंदा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सार्वजनिक गणेश मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी घेतल्यास घरगुती दराने वीजबिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीजजोडणी घेतल्यास सुरक्षितता अधिक असते. म्हणून उत्सव काळात मंडप, रोषणाई, होर्डिंग, देखावे, महाप्रसाद आदी कारणांसाठी लागणारी वीजजोडणी अधिकृत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी, असे आवाहन वीज प्रशासनाने केले आहे. याला शहर आणि जिल्हयातील केवळ ८० मंडळांनीच प्रतिसाद दिल्याचे महावितरणच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.
अधिकृत वीजजोडणी घेतलेल्या मंडळांची विभागनिहाय संख्या अशी : कोल्हापूर शहर विभाग : ५०, ग्रामीण एक : ६, ग्रामीण दोन : ३, जयसिंगपूर : १०, इचलकरंजी : ०, गडहिंग्लज : ११.
कारवाई करण्यात अडचण
अनधिकृत वीजजोडणी कारवाईस पात्र आहे, पण गणेशोत्सव काळ असल्याने आणि मंडळांच्या मागे राजकीयशक्ती असल्याने अनधिकृत वीजजोडणी असली तरी कारवाई करण्यात अडचणी येतात, असे महावितरण प्रशासनाचे म्हणणे आहे.
अनधिकृत वीजजोडणीतील प्रमुख धोके
- लघुदाब, उच्चदाब विद्युत वाहिन्यांची माहिती नसताना वीजजोडणी घेतल्यास शॉर्टसर्किटची शक्यता.
- वीजजोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम नसते.
- ठिकठिकाणी जोड असणारी, तुटलेल्या, लूज वायर वापरल्यास धोका.