वस्त्रोद्योगात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करणार नाही, मंत्री संजय सावकारे यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:00 IST2025-04-25T18:59:32+5:302025-04-25T19:00:05+5:30
सूतगिरण्यांच्या अडचणीसंबंधी बैठक, सकारात्मक चर्चा

वस्त्रोद्योगात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करणार नाही, मंत्री संजय सावकारे यांनी दिले आश्वासन
कोल्हापूर : विदर्भ, मराठवाडा, खान्देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक आहेत. हा भाग मागास आहे. म्हणून शासन या भागातील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन, सवलत देत आहे. मात्र याबाबतीत पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन वस्त्रोद्याेग मंत्री संजय सावकारे यांनी गुरुवारी दिले. पश्चिम महाराष्ट्रातूनही आमचे आमदार, खासदार अधिक निवडून यावेत. पक्ष वाढला पाहिजे, अशी भूमिका असल्याने न्याय भूमिका राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाने आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरण्यांचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. आमदार अशोक माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री सावकारे म्हणाले, तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सन २०२३ मध्ये तयार केलेले वस्त्रोद्योग धोरण देशात चांगले आहे. काही मागण्याही प्रलंबित आहेत. जुन्या सूतगिरण्यांना आधुनिकीकरण, विस्तारीकरणाला पाठबळ देण्यात येणार आहे. सूतगिरण्यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा वापर सौरऊर्जेसाठी आणि वस्त्रोद्योगासाठी देण्याचा विचार करू. शासनाने दिलेल्या भागभांडवलापोटी सूतगिरणीच्या सातबारा उताऱ्यावर बोजा नोंद केल्याच्या तक्रारी आहेत. यातून सकारात्मक मार्ग काढू. मागासवर्गीय सूतगिरण्यांच्या सर्व सभासदांची जात पडताळणी करण्याची सक्ती रद्द करून केवळ संचालकांसाठीच ही अट लावावी, अशा प्रकारची सूचना करतो.
आमदार माने म्हणाले, खासगीप्रमाणेच सहकारी सूतगिरण्यांनाही भागभांडवल मिळावे. मागासर्गीय सूतगिरण्यांच्या सर्व सभासदांच्या जात पडताळणीची सक्ती रद्द
महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, सूतगिरण्यांना मदत, सवलती देताना पश्चिम महाराष्ट्राला कमी आणि विदर्भ, मराठवाडा, खान्देशाला अधिक असे करू नका. खासगी सूतगिरणी काढणाऱ्यांना अधिक भागभांडवल आणि सहकारी सूतगिरण्यांना कमी करणे अन्यायकारक आहे. वस्त्रोद्योगाला उर्जितावस्था येण्यासाठी शासनाकडून भरीव मदत आणि सवलती मिळाव्यात.
बैठकीस अशोक चराटी, प्रा. किसनराव कुराडे, किशाेरी आवाडे, स्वप्निल आवाडे, प्रा. अनिल कुराडे, राजू मगदूम, वैभव गायकवाड, महेश कदम, उमेश भोईटे, सुरेश पाटील यांच्यासह बीड, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सूतगिरणीचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. रणजीत देशमुख यांनी आभार मानले.
७० टक्के लुंग्या इचलकरंजीतील..
दक्षिणेतील लोक नेसतात त्यातील ७० टक्के लुंग्यांचे उत्पादन इचलकरंजीत होते. केंद्र सरकारने भरवलेल्या भारत प्रदर्शनात इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाने प्रभावी ठसा उमटवल्याने तिथे राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.
मला वस्त्रोद्योग खाते का ?
आमदार असताना सातत्याने वस्त्रोद्योगात विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय का, असे प्रश्न विचारत होतो, म्हणून मला वस्त्राेद्योग खाते दिले. तूच ठरव आता याचे धोरण असेही म्हटले असावे, असा उपरोधिक किस्सा, मंत्री सावकारे यांनी सांगितला.
लाडक्या बहिणींना देताच की..
सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा कल्पना शिंगाडे म्हणाल्या, सूतगिरण्यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला आहे. कामगारांना काम मिळाले. महिला स्वावलंबी होत आहेत. यामुळे सूतगिरण्यांना आर्थिक मदत द्यावी. शासन लाडक्या बहिणींना पैसे देते तर सूतगिरण्यांमधून महिला सक्षमीकरण करणाऱ्यांना उद्योगाला निधी का नाही ? सहकार टिकला तर सरकार टिकणार आहे. म्हणून सहकारी सूतगिरण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
पश्चिम महाराष्ट्राने काय पाप केले ?
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरण्या चिकाटीने चालवल्या जातात. कापसाचे दर स्थिर नाहीत. वीज बिल खूप येते आहे. यामुळे सूतगिरणी चालवणे अवघड आहे. शेतीनंतरचा सर्वात अधिक रोजगार वस्त्रोद्योगातून मिळतो. पण अलीकडे आम्हाला मदत कमी केल्याने पश्चिम महाराष्ट्राने काय पाप केले आहे , असा प्रश्न पडत आहे.