गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
By समीर देशपांडे | Updated: September 17, 2024 21:36 IST2024-09-17T21:34:39+5:302024-09-17T21:36:49+5:30
मिरवणुकीत कुठेही अंतर पडणार नाही याची सकाळपासूनच पोलिसांनी दक्षता घेतली.

गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीत सुरू असलेल्या दणदणाटाला आता संध्याकाळी प्रकाशाच्या लखलखाटाची जोड मिळाली आहे. परंतू गेल्यावर्षीच्या तुलनेत मिरवणुकीला वेग असून पोलिसांनी कुठेही मध्ये अंतर पडणार नाही याची दक्षता सकाळपासूनच घेतली आहे.
मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा मार्गे खणीमध्ये विसर्जनासाठी सकाळपासून सार्वजनिक गणेश मंडळांची गर्दी झाली आहे. दुपारी थोडी संथ झालेली मिरवणूक पुन्हा पाचनंतर वेगवान झाली आहे. विविध मंडळांनी वैविध्यपूर्ण आणि रंगीबेरंगी प्रकाशयोजना मिरवणुकीत आणली असून ही दृश्ये आणि विविध रूपातील गणेश मूर्ती डोळ्यात साठवण्यासाठी नागरिकांचीही गर्दी वाढू लागली आहे.
संभाजीनगर रस्ता, न्यू महाव्दार रोडवरून अनेक मूर्ती मुख्य मार्गावर येण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतू मिरजकर तिकटीवर पोलिसांनी याचे चांगले नियोजन केले आहे. विधानसभा तोंडावर असल्याने सर्व नेतेमंडळी बाहेर पडली असून विविध पक्ष, संघटनांच्या स्वागत कक्षामध्ये बसून मंडळांना श्रीफळ आणि पानसुपारी दिली जात आहे. अनेक ठिकाणी नेते मंडळी लेझीम खेळत असून वेगवेगळ्या गाण्यांवर तरूणाई थिरकताना दिसत आहे.