Kolhapur Municipal Corporation Election: राजकीय दबाव झुगारून काम करा, अतिरिक्त आयुक्तांनी टोचले बीएलओंचे कान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:33 IST2025-11-26T12:32:27+5:302025-11-26T12:33:43+5:30
५ डिसेंबरपर्यंत विभागीय कार्यालयांमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश

Kolhapur Municipal Corporation Election: राजकीय दबाव झुगारून काम करा, अतिरिक्त आयुक्तांनी टोचले बीएलओंचे कान
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीबाबत विविध पक्ष व संघटनांकडून आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक हरकतीची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी बीएलओंसह पर्यवेक्षकांना दिले.
आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, उप-शहर अभियंता उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी जे झालं ते झालं. राजकीय दबावाला बळी न पडता चोख काम करा अशा सूचना दिल्या.
प्रशासक के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करताना कोणतीही चूक राहू नये यासाठी पूर्ण दक्षता घ्यावी. कामामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी तसेच अन्य जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्राप्त झालेल्या सर्व हरकतींच्या आवश्यक निराकरणाबाबत छत्रपती शाहू सभागृहात विभागीय कार्यालय निहाय बीएलओ, पर्यवेक्षक सर्व मीटर रिडर, घरफाळा विभागाकडील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी, आरोग्य निरिक्षक व मुकादम यांची बैठक झाली. रविकांत अडसूळ यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कोणतीही हरकत न सोडता पूर्ण निराकरण करण्याचे निर्देश दिले.
कामकाजात अडचणी आल्यास संबंधित सहायक आयुक्त किंवा उप-शहर अभियंत्यांशी समन्वय साधून त्वरित निराकरण करावे, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ९०० महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व बीएलओंना विभागीय कार्यालय क्रमांक ३ मध्ये ५ डिसेंबरपर्यंत रोज उपस्थित राहून अहवाल देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
बीएलओना मदतीसाठी अतिरिक्त कर्मचारी
मीटर रीडर, घरफाळा विभागातील कर्मचारी, आरोग्य निरीक्षक व मुकादम यांची विभागनिहाय स्वतंत्र आदेशाद्वारे बीएलओना मदतीसाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत.