डी.जे.च्या आवाजातही पारंपरिक वाद्यांचा ठसा, कोल्हापुरात सव्वीस तास रंगला विसर्जन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:40 IST2025-09-08T18:39:43+5:302025-09-08T18:40:20+5:30

इराणी खणीवर १५६१ मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Ganesh immersion ceremony held for 26 hours in Kolhapur | डी.जे.च्या आवाजातही पारंपरिक वाद्यांचा ठसा, कोल्हापुरात सव्वीस तास रंगला विसर्जन सोहळा

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : डोळ्यांचे पडदे आणि खुले आकाश भेदणारी रंगीबेरंगी आतषबाजी, छातीत धडकी भरावी अशा साऊंड सिस्टीम, कानठळ्या बसविणाऱ्या झांज-ढोल ताशांचा दणदणाट, लेझीम, धनगरी ढोल, बँड, बेंजो, आदी पारंपरिक वाद्यांचा अखंड गजर, संत महात्म्यांची परंपरा तसेच इतिहासकालीन प्रसंगावर आधारित देखावे यासह लाखो भाविकांचा सहभाग अशा अभूतपूर्व उत्साहात शनिवारी सार्वजनिक गणेश विसर्जनाची मिरवणूक पार पडली. किरकोळ चेंगराचेंगरी, पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झालेली वादावादी, पोलिसांनी प्रसंगानुसार केलेला सौम्य छडीमार वगळता संपूर्ण मिरवणूक सोहळा शांततेत झाला.

मिरवणुकीत मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टीम न आणता पारंपरिक वाद्ये आणावीत असे जिल्हा व पोलिस प्रशासनाने आवाहन केले होते, परंतु काही मंडळांनी त्याला छेद देऊन डी. जे. लावलाच. त्यामुळे मुख्य मिरवणूक मार्ग दुपारी चार वाजल्यानंतर अक्षरश: दणाणून गेला. शनिवारी सकाळी नऊ वाजता तुकाराम माळी तालमीच्या मानाच्या गणपतीपासून सुरू झालेल्या मुख्य मिरवणुकीची सांगता रविवारी सकाळी नऊ वाजता प्रतिभानगरातील शाहू फ्रेंडस् सर्कलच्या गणेशमूर्ती विसर्जनाने झाली. मिरवणुकीला प्रत्यक्ष सुरुवात नऊ वाजता झाली असली तरी त्याआधीही मूर्तींचे विसर्जन झाले होते. मुख्य मिरवणूक संपल्यानंतरही रविवारी दिवसभर गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका सुरूच होत्या.

शहरात विविध भागात महापालिकेला अर्पण केलेल्या आणि इराणी खण येथे सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या १५६१ मोठ्या गणेशमूर्ती व १२०३ लहान गणेशमूर्ती अशा २७६४ गणेशमूर्ती इराणी खण येथे विसर्जित करण्यात आल्या. मूर्तीअर्पण आवाहनास अनेक मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच मिरवणूक नियोजन पद्धतीने व शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्या वतीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले. इराणी खणीवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गर्दीचा महासागर उसळला होता.

यावर्षीच्या गणेशोत्सवाला महापालिकेची निवडणुकीची झालर लागल्यामुळे उत्सवात प्रचंड जोर होता. मोठ्या मंडळांनी डी.जे., प्रखर विद्युत रोषणाई आणली, तर लहान मंडळांनीही विविध प्रकारची वाद्ये मिरवणुकीत आणली होती. मिरवणुकीत महिलांसह आबालवृद्धांचा सहभाग हेही एक वैशिष्ट्य ठरले. महिलांनी नऊवारी साड्या, नाकात नथ तसेच एकसारख्या साड्या नेसून घेतलेला सहभाग लक्षवेधी ठरला. डी.जे.च्या दणदणाटातही लाठीकाठी, तलवारबाजी या मर्दानी खेळांनी, तर लेझीम, धनगरी ढोलने वाहव्वा मिळविली. तिरूपती बालाजी, अंबाबाई मूर्तीने मिरवणुकीत भक्तिरस निर्माण केला.

मिरजकर तिकटीला तणाव

मिरजकर तिकटी येथे बालगोपाल, दिलबहार आणि पाटाकडील तालमीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पुढे जाण्यावरून काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. तीनही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू होता. पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, किशोर शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

खरी कॉर्नरला लाठीमार

खरी कॉर्नर येथे दुपारी एकच्या सुमारास शहाजी तरुण मंडळ, अवचितपीर आणि बीजीएम स्पोर्ट्स यांच्यात मिरवणुकीतील नंबरवरून वाद सुरू झाला. यातच शहाजी तरुण मंडळाची गणेश मूर्ती येण्यास उशीर झाल्यामुळे अवचितपीर आणि बीजएमच्या कार्यकर्त्यांनी पुढे सोडण्याचा आग्रह धरला. यातून शहाजी तरुण मंडळ आणि अवचितपीरच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगविले.

इचलकरंजीत विसर्जन मिरवणूक चालली २५ तास

इचलकरंजीत विसर्जन मिरवणूक तब्बल २५ तास चालली. रविवारी सकाळी १२ वाजून १५ मिनिटांनी शेवटच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. निर्विघ्नपणे विसर्जन मिरवणूक पार पडली. पावसाने घेतलेल्या विसाव्यामुळे साउंड सिस्टिम व पारंपरिक वाद्यांच्या आवाजावर गणेश भक्तांना ठेका धरणे शक्य झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील महिला व पुरुषांनी केलेला पोशाख आणि भव्यदिव्य मूर्ती लक्षवेधी ठरली.

Web Title: Ganesh immersion ceremony held for 26 hours in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.