हद्दपार 'डीजे' पुन्हा डोक्यावर, सारं कांही मतांसाठी
By विश्वास पाटील | Updated: September 2, 2022 12:11 IST2022-09-02T12:10:55+5:302022-09-02T12:11:31+5:30
यापूर्वी २०१७ ला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हा दणदणाट बंद केला. त्यासाठी त्यांना मंडळांचा रोष पत्करावा लागला. परंतु त्यांनी ते हिमतीने केले. त्याच मंत्री पाटील यांच्या पक्षाचे सध्या राज्यात सरकार असताना मात्र परिवर्तनाचे चक्र उलटे फिरवण्याचे पाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हद्दपार 'डीजे' पुन्हा डोक्यावर, सारं कांही मतांसाठी
विश्वास पाटील
कोल्हापूर : गेली चार-पाच वर्षे राजकीय इच्छाशक्ती, पोलीस व जिल्हा प्रशासनाचे जाणीवपूर्वक प्रयत्न, त्यास मंडळांनी दिलेला प्रतिसाद यामुळे गणेश उत्सवात आगमन व विसर्जनादिवशी होणारा डीजेचा दणदणाट पुरता हद्दपार झाला परंतु यावर्षी राज्यात सत्तांतर झाले आणि सरकारने सगळेच निर्बंध दूर केले. त्यामुळे कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने बुधवारी कोल्हापूरकरांचे मन व मेंदू बधिर झाला. हे कोणीच थांबवू शकत नाही का, अशी हतबलताही समाजातून व्यक्त झाली.
बाप्पा हा बुद्धीची देवता परंतु त्याच्याच समोर मद्यपान व गुटखा खाऊन बीभत्स नृत्य, वाद्यांचा दणदणाट करून आपण कोणती धार्मिक भावना जोपासतो आहोत याचाच विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सामान्य माणसाला या सगळ्या प्रकारचा कमालीचा तिटकारा आला आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरा करण्यावर मर्यादा होत्या. एका अर्थाने ते फार चांगले होते असाच बुधवारचा अनुभव होता. साऱ्या शहरभर वाहनांची प्रचंड कोंडी, रंगीबेरंगी लेसर लाईट आणि मोठ्या आवाजांवर नुसता धिंगाणा सुरू आहे आणि पोलीस हतबलपणे हे सारे पाहत आहेत असेच चित्र दिसत होते. कोल्हापूरने हा धिंगाणा फार प्रयत्नपूर्वक बंद केला होता.
परिवर्तनाचे चक्र उलटे
यापूर्वी २०१७ ला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हा दणदणाट बंद केला. त्यासाठी त्यांना मंडळांचा रोष पत्करावा लागला. परंतु त्यांनी ते हिमतीने केले. प्रत्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांना जाऊन ते भेटले. तुम्ही शांततेत मिरवणूक काढा, तुमच्या विधायक उपक्रमासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला व मिरवणुकीतील धिंगाणा बंद केला. त्याचा एक चांगला संदेश राज्यभरात गेला. त्याच मंत्री पाटील यांच्या पक्षाचे सध्या राज्यात सरकार असताना मात्र परिवर्तनाचे चक्र उलटे फिरवण्याचे पाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत आले असल्याने सण-उत्सव दणक्यात साजरे करा, असे राज्यकर्ते जाहीरपणे सांगू लागल्याचाच हा परिणाम आहे. ज्या हिंदूंच्या मतांसाठी सरकारने सगळे निर्बंध दूर केले आहेत, त्यांना मन, बुद्धी, विचार आहेत आणि उत्सवातील हा हिडीसपणा कोणत्याही सामान्य माणसाला आवडत नाही हे ठणकावून सांगण्याची गरज आहे.
सारं कांही मतांसाठी...
महापालिका निवडणुका समोर असल्याने कोणताच राजकीय पक्ष व नेता याविरोधात ब्र काढायला तयार नाही. उलट अनेकांनी मंडळांना सढळ हाताने मदत केली आहे. मंडळाच्या आरतीला जाऊन निवडणुकीच्या जोडण्या लावण्यात त्यांना आनंद वाटत आहे. मतांसाठी धार्मिक भावनांना गोंजारण्याचा हा प्रकार आहे.
लाइट बंदमुळे अस्वस्थ...
राजारामपुरी हा उच्चवर्गीय उच्चशिक्षित नागरी समाज असलेला परिसर. तिथे एरवी कोण मोठ्या आवाजात बोलत नाही अशी संस्कृती. परंतु या परिसरांतील बाप्पाच्या आगमनादिवशीचा नंगानाच मनस्ताप देणारा होता. मिरवणुकीत काही अनुचित घटना घडू नये म्हणून महावितरण कंपनीने दुपारी तीन ते रात्री १२ पर्यंत त्या पूर्ण परिसरातील लाइट बंद केली. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. त्या परिसरात सुमारे शंभराहून जास्त दवाखाने आहेत. तेथील रुग्णांची लाइट गेल्याने काय स्थिती झाली असेल याचा विचारच केलेला बरा. गणपती तुमच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी येतो इथे तर त्याच्या उलटेच झाले. राजारामपुरीनेच आता हे आणखी किती दिवस चालू द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मूळ हेतूलाच हरताळ..
यंदा या उत्सवात कुठेही पारंपरिक वाद्ये, पारंपरिक खेळ दिसले नाहीत. प्रबोधनाचे साधन म्हणून हा उत्सव सुरू झाला परंतु सामाजिक उपक्रम, व्याख्याने, प्रबोधन, जनजागरण यातले काहीच होताना दिसत नाही. कुंभार बांधवांकडून मूर्ती आणायची ही पद्धतही बंद होत आहे. मंडप घालण्यापासून सगळे डेकोरेशन पैसे देऊन आणले जाते. मिरवणुकीत लाइट आणि डीजे लावून नाचायचे म्हणजे झाला उत्सव. कार्यकर्त्यांची सगळी ऊर्जा यातच खर्ची पडत आहे.
अंगावर काटाच..
बाप्पाच्या आगमनादिवशीच एवढा त्रास झाला असेल तर मग विसर्जन मिरवणुकीत यंदा काय होईल याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहत आहे. महाद्वार रोडवरील नागरिकांनाही या मिरवणुकीचा प्रचंड मनस्ताप होतो पण सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी त्यांची स्थिती होते.