भक्तांनी केला पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा श्रीगणेशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 03:24 IST2020-08-14T03:24:29+5:302020-08-14T03:24:41+5:30
शाडूच्या गणेशमूर्ती घरी केल्यापोहोच; गर्दी टाळून उत्सवाचा आनंद, २० वर्षांपासून उपक्रम

भक्तांनी केला पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाचा श्रीगणेशा
- संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव असताना गर्दी टाळत आणि शारीरिक अंतर ठेवत कोल्हापुरातील १५०० भक्तांनी आजअखेर शाडूच्या गणेशमूर्ती आपल्या घरी आणून पर्यावरणेस्नेही गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला.
येथील निसर्गमित्र परिवाराकडून गेली २० वर्षे जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यास पर्यावरणस्रेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले जाते. याला प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेकडून नैसर्गिक रंगात रंगवलेल्या छोट्या आकाराच्या गणेशमूर्ती माफक किमतीत देण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षीही कोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत १५०० गणेशाच्या मूर्ती नागरिकांच्या घरी पोहोच करून धोका टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. शाहूपुरीतील कुंभार गल्लीतील कमलाकर आरेकर आणि प्रकाश आरेकर हे बंधू गेली २० वर्षे शाडूच्या गणेशमूर्ती तयार करून त्या वनस्पतिजन्य रंगात रंगवून देण्याचा उपक्रम राबवितात. मूर्तिकारांनीही भक्तांच्या घरी गणेशमूर्ती पोहोचवल्याने गर्दीत वावरण्याचा धोका कमी करण्याचा प्रयत्न झाला. निसर्गप्रेमी संस्थेने याबाबतीत केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला.