मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप
By राजाराम लोंढे | Updated: November 17, 2025 12:51 IST2025-11-17T12:50:54+5:302025-11-17T12:51:55+5:30
‘मनसे’ला सोबत घेणार?; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची व्यूहरचना तयार

मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप
राजाराम लोंढे
कोल्हापूर : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने उद्धवसेनेसोबतची मैत्री तोडल्याने त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार हे निश्चित आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंध राहणार आहे. नगरपालिका निवडणुकीत प्रत्येकाच्या ताकदीनुसार जागांचे वाटप झाले असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची व्यूहरचना तयार आहे.
राज्यात २०१९ मध्ये अनपेक्षितपणे आकारास येत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. सत्तेतून पाय उतार व्हावे लागले, तरी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका त्यांनी एकसंधपणे लढवल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ते असेच सामोरे जातील, असे वाटत असतानाच मुंबई महापालिकेच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये ठिणकी पडली आहे. ‘मनसे’ला सोबत घेतल्याने काँग्रेसने उद्धवसेनेसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत.
पण, कोल्हापुरात तिन्ही पक्षांना एकमेकांची साथ हवी आहे. बलाढ्य महायुतीला तोंड द्यायचे असल्यास एकीने राजकारण करायला हवे, याची जाणीव तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळे राज्य पातळीवर काहीही झाले, तरी जिल्ह्यात एकसंध राहण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापुरात ‘मनसे’ला सोबत घेणार का?
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी ‘मनसे’चे अस्तित्व आहे. मुंबईसह इतर महापालिकांमध्ये ते उद्धवसेनेसोबत राहणार असेच चित्र सध्या तरी दिसते. मात्र, कोल्हापुरात नेमके काय होणार, याची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.
‘नंदाताईं’च्या भूमिकेने आघाडीत संमभ्रवस्था
नंदाताई बाभूळकर यांनी ‘चंदगड’ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोडून कोणाशीही आघाडी करण्याच मुभा दिली आहे. मात्र, या भूमिकेने आघाडीत काहीशी संमभ्रवस्था आहे.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंध आहोत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आमची तयारी पूर्ण झाली असून, प्रत्येक जागा आम्ही ताकदीने लढणार आहोत. - आमदार सतेज पाटील (काँग्रेस गटनेते, विधान परिषद)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकसंधपणेच लढणार आहे. रोज आमचा आढावा सुरू असून, मतदारसंघनिहाय व्यूहरचना केली जात आहे. - विजय देवणे (सहसंपर्क प्रमुख, उद्धवसेना)
कोल्हापुरात आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत. आमच्यामध्ये एक वाक्यता असून, त्यादृष्टीने आमची तयारी झालेली आहे. - व्ही. बी. पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)