'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By समीर देशपांडे | Updated: January 13, 2026 06:10 IST2026-01-13T06:09:40+5:302026-01-13T06:10:27+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोल्हापुरात मिसळ कट्ट्यावर दिलखुलास गप्पा

'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समीर देशपांडे
कोल्हापूर : राजकारणात आलो नसतो तर वकिलीचे शिक्षण घेतल्याने वकीलच झालो असतो. एकनाथ शिंदे कामगार नेते किंवा सामाजिक कामात उतरले असते. अजित पवार यांनी शेती केली असती किंवा सर्वांना दमात घ्यायचा स्वभाव पाहता ते पोलिस इन्स्पेक्टर झाले असते, असे भन्नाट उत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूरमध्ये भाजपच्या वतीने आयोजित 'मिसळ कट्टया'वरील गप्पा दिलखुलास रंगविल्या.
या गप्पांच्या कार्यक्रमाचे २० वॉर्डामध्ये लाइव्ह प्रसारण करण्यात आले. यावेळी अभिनेते स्वप्निल राजशेखर, चारुदत्त जोशी आणि कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. रॅपिड सेक्शनमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे खुसखुशीत उत्तर देत त्यांनी टाळ्या घेतल्या. कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत सध्याची स्थिती. भविष्यातील नियोजन सांगतानाच त्यांनी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये देशातील पहिली इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था सुरू करत असल्याचीही माहिती दिली.
मिसळवर मारला ताव
मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत संपता संपता त्यांच्यासाठी मिसळ आणली गेली. त्यांनी व्यासपीठावरच मिसळचा आस्वाद घेतला. इतक्यात समूह छायाचित्रासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्याशी बोलता बोलता त्यांनी उभं राहूनच मिसळ संपवली आणि विजयाची खुण केली.
रफी ते अरजितसिंग आवडतो म्हणत गायलेही तुम्हाला कोणकोणते गायक आवडतात असे विचारल्यानंतर त्यांनी मोहम्मद रफींपासून ते अरजितसिंगपर्यंत सर्वांची आठवण काढली. महिला गायकांमध्ये श्रेया घोषाल आवडतात, असे सांगितले. गाणे कुठले आवडते, असे विचारल्यावर त्यांनी या निवडणुकीच्या काळात हे गाणे माझे आवडते आहे असे सांगत गाणे म्हणून दाखविले.
गाण्याबाबत अमृताशी अलिखित करार..
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, घरात आमचा एक अलिखित करार झाला होता. माझी गाणी खूप पाठ आहेत. परंतु मला सुरात गायला येत नाही.
इतका वेळ शांत बसलेली समोरची माणसं भूकंप झाल्यासारखी पळून जातील असे सांगत ते म्हणाले, माझे लिरिक्स आणि तिने गाणे म्हणायचे असा हा आमचा करार आहे.
मालमत्ता करमाफीवर विरोधकांचे अॅफिडेव्हिट फसवे : मुख्यमंत्री
पनवेल महानगरपालिकेत मालमत्ता कर वाढीचा मुद्दा गाजत आहे. विरोधकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील मालमत्ता करमाफीतील ६५ टक्के सुटीचे एफिडेव्हिट हे फसवे असून पनवेलकर त्याला भुलणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कळंबोली येथे भाजपने व्हिजन २०३० या संकल्पनेवर आधारित 'काय म्हणता पनवेलकर' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा पुनरुच्चार करीत नाव देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.