Kolhapur Politics: नरके विरोधकच; ‘पी. एन’ गट म्हणूनच लढणार; राहुल पाटील यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:50 IST2025-08-21T17:50:28+5:302025-08-21T17:50:52+5:30
सोमवारी सडोली खालसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Kolhapur Politics: नरके विरोधकच; ‘पी. एन’ गट म्हणूनच लढणार; राहुल पाटील यांची स्पष्टोक्ती
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये असला तरी ‘करवीर’मध्ये चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच आहेत, आगामी सर्वच निवडणुका पी. एन. पाटील गट म्हणून लढणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राहुल पाटील म्हणाले, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांनी आयुष्य काँग्रेसमध्ये घातले. त्यांच्या पश्चात विशेषत: विधानसभा निवडणुकीनंतर प्रशासकीय पातळीवर कार्यकर्त्यांची कामे होईनात. ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या कर्जाचे एक कारण असले तरी कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय थांबवून त्यांना बळ देण्याबरोबरच गट टिकवायचा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाशिवाय पर्याय नव्हता. महायुतीमध्ये काही पक्ष असले तरी चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधक आहेत, कोणत्याही परिस्थितीत २०२९ची विधानसभा मी लढणारच, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगूनच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सडोली खालसा (ता. करवीर) येथे मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थित पी. एन. पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.
जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, ‘भोगावती’ अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. एच. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, शंकरराव पाटील-वरणगेकर, शिवाजी कवठेकर, हंबीरराव पाटील, शिवाजी आडनाईक, विजय पाटील, प्रकाश मुगडे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
सतेज पाटील यांनी मदत केली
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या पश्चात विधानसभा निवडणुकीसह सर्वच ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी मदत केली. त्यांच्या सोबत पक्षांतराबाबत चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ‘भोगावती’ कारखान्याच्या सत्तेतील माजी आमदार संपतराव पवार, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचे समर्थन घेतले.
‘भाजप’शी कधीच चर्चा नव्हती
विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही भाजपसोबत जाणार अशी चर्चा होती; पण आम्ही याबाबत भाजप नेतृत्वाशी कधीच चर्चा केली नाही.
राजीव गांधी जयंतीचा कार्यक्रम चालूच राहील
दिवंगत आमदार यांनी ३३ वर्षे राजीव गांधी जयंती साजरी केली. आमचा राजकीय निर्णय वेगळा असला तरी राजीव गांधी यांची जयंतीचा कार्यक्रम चालूच राहील.