Back to the voting of women voters for Kankavali Lok Sabha elections | कणकवलीत लोकसभा निवडणुकीसाठी महिला मतदारांची मतदानाकडे पाठ

कणकवलीत लोकसभा निवडणुकीसाठी महिला मतदारांची मतदानाकडे पाठ

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी महिला मतदारांची मतदानाकडे पाठ कणकवली तालुक्यातील स्थिती

सुधीर राणे

कणकवली : कणकवली तालुक्यात २०१९ च्या रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ६३.७९% मतदान झाले आहे. ६६ हजार ६४९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये ३३हजार ९४१ पुरुष व ३२हजार ७०८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

तालुक्यात १ लाख ४ हजार ४८८ एकूण मतदार होते. त्यामध्ये पुरुष ५१हजार ४४३ तर ५३ हजार ४५ स्त्री मतदारांचा समावेश होता. पुरुष मतदारांपेक्षा १ हजार ६०२ स्त्री मतदारांची संख्या जास्त होती. मात्र झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर पुरुष मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत पाहीले असता स्त्री मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसते.

कणकवली तालुक्यातील मतदारांनी यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत नारायण राणेंची पाठराखण केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीतही थोड्या बहुत फरकाने तशीच स्थिती होती. जिल्हा परिषदेच्या आठही जागा आणि पंचायत समितीवर एक हाती सत्ता राखण्याचा विक्रम नारायण राणे यांना नोंदविण्यास मतदारांनी मदत केली होती.

सलग चौथ्यांदा कणकवलीत काँग्रेसने आपले एक हाती वर्चस्व राखून शिवसेना ,भाजपला चांगलाच धक्का दिला होता. आता नारायण राणे यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. या नवीन पक्षासमोर आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्याचे खरे आव्हान होते. त्यामध्ये ते किती यशस्वी झाले ? हे लवकरच समजेल.

सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातून शिवसेनेचे विनायक राऊत निवडून आले होते. मात्र कणकवली तालुक्याने त्यावेळी काँग्रेसच्यावतीने निवडणूक लढविलेल्या निलेश राणे यांना साथ देत १ हजार ९५८चे मताधिक्य दिले होते. त्यावेळी कणकवली तालुक्यातून ३३ हजार १९० मते निलेश राणे यांना मिळाली होती. तर विनायक राऊत याना ३१ हजार २३२ मते मिळाली होती.

या लोकसभा निवडणुकीनंतरच्या विधानसभा निवडणुकीतही कणकवली तालुक्यात काँग्रेसला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे नितेश राणे यांचा विजय सुकर झाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतही कणकवली तालुक्यात काँग्रेसचेच वर्चस्व कायम राहीले होते. त्या

मुळे त्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना - भाजप स्वतंत्र लढत असली तरी तालुक्यात काँग्रेसला रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १८ जागांवर छुपी युती करण्यात आली होती. शिवसेना- भाजपच्या या रणनीतीमुळे काँग्रेसला त्या निवडणुकीत जोरदार धक्का बसेल अशीही चर्चा होती. मात्र काँग्रेसने तालुक्यातील आठही जिल्हा परिषद मतदार संघात पंधराशे ते साडे तीन हजारांचे मताधिक्य मिळविले होते.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस मधून बाहेर पडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ठ्या काँग्रेस मध्ये असलेले सर्व जिल्हा परिषद ,पंचायत समिती सदस्य आता नवीन पक्षा सोबत आहेत. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने काँग्रेसने नवीनचंद्र बांदिवडेकर याना उमेदवारी दिली होती. त्यामुळे वर्षानुवर्षं काँग्रेसचे मतदार असलेल्यांनी बांदिवडेकराना कितपत साथ दिली ? तसेच राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला का? हेही तितकेच महत्वाचे आहे.

तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यावर नाराज असलेल्या भाजप कार्यकर्त्यानी त्यांना मतदान करून युती बळकट केली का? की दुसराच मार्ग चोखाळून विरोधकांना साथ दिली . हे सर्व प्रश्न आता जरी अनुत्तरित असले तरी २३ मे रोजी निवडणूक निकाला नंतर ' कौन कितने पाणी मे' हे स्पष्ट होणार आहे. तसेच विधान सभा निवडणुकीतही शिवसेना - भाजप युती करण्याचे आता जरी ठरले असले तरी त्याबाबत पुनर्विचार करण्याची वेळही या निकाला नंतर येऊ शकते.

कणकवली तालुक्यात सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी असलेली राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. काँग्रेस मध्ये असलेल्या अनेक नेत्यांनी शिवसेना ,भाजप पक्षात प्रवेश केले आहेत. त्यांची मदत विनायक राऊत याना या निवडणुकीत झाली का ? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मात्र, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना -भाजप युती व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातच खऱ्या अर्थाने कांटे की टक्कर झाली होती. त्यामुळे या मतदार संघातील मतदार विनायक राऊत की निलेश राणे यांना साथ देणार यावरूनही त्यांच्या विजयाची गणिते ठरणार आहेत.

Web Title: Back to the voting of women voters for Kankavali Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.