इचलकरंजीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ; नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 19:34 IST2021-04-07T19:30:50+5:302021-04-07T19:34:50+5:30
CoronaVirus Ichlkarnji Kolhapur- महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरात बुधवारी कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिस आणि नगरपालिकाा प्रशासन यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. दरम्यान, कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

इचलकरंजीत मुख्य मार्गावरील दुकाने पोलिस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बंद केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, आदी सहभागी झाले होते. ( छाया-उत्तम पाटील)
इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरात बुधवारी कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलिस आणि नगरपालिकाा प्रशासन यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. दरम्यान, कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून कारवाई करण्यास सुरुवात केली. के.एल. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा ते कबनूर मार्गावरील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली. त्यानंतर शहरातील सर्वच मुख्य मार्गांवर कारवाई सुरू झाल्याने धावपळ करत व्यापाऱ्यांनी आपली आस्थापना बंद केली.
पथकाने नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करत दंड वसूल केला. नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील व पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी ही कारवाई केली. अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरिकांची तारांबळ उडाली.
नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच मास्क न वापरणे, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवरही दंडाची कारवाई केली. यावेळी व्यापारी व पोलीस यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता, दुकाने कशी काय बंद करता, असा सवाल व्यापाºयांनी उपस्थित केला. पोलिसांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचे सांगत कारवाई सुरूच ठेवली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था
महाराष्ट्र शासनाने कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या नियमावलीनुसार व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. मात्र, पोलिसांनी अचानक दुकाने बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर दुकाने बंद करण्यात आली. कोणती दुकाने सुरू ठेवावीत व कोणती बंद ठेवावीत, यावरून संभ्रम निर्माण झाला होता.