उद्धवसेनेने इच्छुकांना अर्जांचे वाटप करूनही अळीमिळी गुपचिळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:09 IST2025-12-30T15:09:11+5:302025-12-30T15:09:11+5:30
भाजपच्या काही इच्छुकांनी एबी फॉर्म मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठी समाज माध्यमावर एबी फॉर्मसह इच्छुक, त्यांचे निकटवर्तीय असे फोटो व्हायरल केले.

उद्धवसेनेने इच्छुकांना अर्जांचे वाटप करूनही अळीमिळी गुपचिळी
अनिकेत घमंडी -
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी भाजपने सोमवारपर्यंत ४४ इच्छुकांना एबी फॉर्म दिल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. कल्याण-डोंबिवली मिळून ही संख्या असल्याचे सांगण्यात आले. शिंदेसेना मंगळवारी पहाटेपर्यंत एबी फॉर्म देणार असून उद्धवसेनेनेही फॉर्म दिले असले तरी त्यांनी मौन धारण केले आहे. युती झाल्यास भाजपला एकूण किती जागा मिळणार याबाबत तसेच अन्य किती फॉर्म वाटप करणे बाकी आहे, याबाबत माहिती मात्र मिळू शकलेली नाही.
भाजपच्या काही इच्छुकांनी एबी फॉर्म मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठी समाज माध्यमावर एबी फॉर्मसह इच्छुक, त्यांचे निकटवर्तीय असे फोटो व्हायरल केले.
पूर्ण पॅनल तेथे दिले फॉर्म
ज्या ठिकाणी भाजपचे पूर्ण पॅनल आहे अशा ठिकाणी एबी फॉर्म दिल्याची पक्षात चर्चा होती. शिंदेसेनेने मात्र एबी फॉर्म दिले नसून एकेका घरातील तिघांचेही इच्छुक म्हणून फॉर्म भरून घेतल्याची माहिती एका कुटुंबीयांनी दिली. उद्धवसेनेनेही इच्छुकांना फॉर्म दिले असले तरी नावे सांगण्याबाबत अळीमिळी गुपचिळीचे धोरण घेतले.
६० जागा उद्धवसेनेच्या वाट्याला ६० जागा आल्या आहेत. मंगळवार, ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची चांगलीच धावपळ उडणार आहे.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
मनसेकडून तीन उमेदवारांचे अर्ज दाखल
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी मनसेचे उमेदवार योगेश पाटील यांनी पॅनेल क्रमांक ३० मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मनसेने पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मनसेचे नेते राजू पाटील उपस्थित होते.
तर पॅनेल क्रमांक २ मधून मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी तर पॅनेल क्रमांक ५ मधून भोईर
यांच्या पत्नी रेखा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यादी जाहीर होण्याआधीच मनसेकडून अर्ज दाखल
मनसे ५२ जागा लढविणार आहे. त्यांची यादी जाहीर होण्यापूर्वीच काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच मनसेचे जे पदाधिकारी उमेदवारीसाठी भाजप, शिंदेसेनेत गेले, त्यांच्याकडून पुन्हा मनसेकडे उमेदवारी देण्याची मागणी केली जाते.
मनसेच्या माजी नगरसेविका तृप्ती भोईर यांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यांनी रविवारी सायंकाळी पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी भोईर यांना भेट नाकारल्याने त्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले.
उद्धवसेनेची होणार दमछाक
उद्धवसेनेच्या वाट्याला ६० जागा आल्या आहेत. त्यांच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मंगळवार, ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्धवसेनेच्या उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरताना दमछाक होणार आहे.