युतीची कुंडली जुळल्याखेरीज उमेदवारांची यादी नाही; शिंदेसेनेची केडीएमसीत भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:59 IST2025-12-24T09:59:44+5:302025-12-24T09:59:58+5:30
इच्छुक उमेदवाराचा प्रभागातील जनसंपर्क, त्याने केलेली कामे आणि त्याची निवडून येण्याची क्षमता, या गोष्टी विचारात घेऊन संबंधित इच्छुकाला उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

युतीची कुंडली जुळल्याखेरीज उमेदवारांची यादी नाही; शिंदेसेनेची केडीएमसीत भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डाेंबिवली महापालिका निवडणुकीत महायुती करण्याविषयी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. ही बोलणी होऊन जागा वाटपाचा निर्णय झाल्यावरच शिंदेसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मंगळवारी दिली.
डोंबिवली पूर्व पश्चिमेतून शिंदेसेनेकडून ५५० उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्या.
इच्छुक उमेदवाराचा प्रभागातील जनसंपर्क, त्याने केलेली कामे आणि त्याची निवडून येण्याची क्षमता, या गोष्टी विचारात घेऊन संबंधित इच्छुकाला उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. शिंदेसेनेच्या उमेदवारांची यादी पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंंदे हे जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय अपेक्षित आहे. महायुती झाल्यावर कोणी किती जागा लढवायच्या याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाप्रमुख लांडगे यांनी घेतल्या. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी भाऊ चौधरी, अरुण आशाण आदी उपस्थित होते. मुलाखतीसाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. मुलाखती पार पडल्या असल्या तरी आत्ता उमेदवारांच्या यादीत नाव येणार की नाही ?, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. हातात दिवस कमी असल्याने इच्छुकांची धाकधूक अद्याप कायम आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील शिंदेसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या बुधवारी घेतल्या जाणार होत्या. काही कारणास्तव त्या आज होऊ शकल्या नाहीत.
तुम्ही प्रभागात फिरता का ?
मुलाखतीच्या वेळी काही इच्छुकांना तुम्ही प्रभागात फिरता का ? हा प्रश्न विचारला गेला. इच्छुकांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर लांडगे यांनी तुम्ही प्रभागात फिरत नाही, असे सांगताच काही इच्छुकांची भंबेरी उडाली. अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकीत शिंदेसेनेचा ज्या प्रभागात पराभव झाला. त्या प्रभागातील उमेदवार हे त्यांच्या प्रभागापुरता विचार करीत होते. मात्र, महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय असल्याने चारही सदस्यांनी एकत्रित फिरून प्रचार करावा, अशी सूचना इच्छुकांना केली.
मुलाखत घेणाऱ्यांचा वडापाववर ताव
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक पॅनलमधील चार सदस्यांची मुलाखत घेतली जात होती. मुलाखती लांबल्याने मुलाखत घेणाऱ्यांना जोराची भूक लागली. त्यांना वडापाव मागवला. गरमागरम चहासोबत वडापाव खाल्ल्यावर पुन्हा मुलाखती सुरू केल्या.