पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:40 IST2025-08-26T13:23:04+5:302025-08-26T13:40:27+5:30
जास्त मूर्तींची बुकिंग घेऊन काम वेळेत पूर्ण न झाल्याने इथला मूर्तीकार पसार झाल्याची माहिती आहे.

पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
डोंबिवली - मागील २-३ महिन्यांपासून गणेशोत्सवाची लगबग राज्यात सुरू आहे. त्यात लाडक्या बाप्पाचं आगमन काही तासांवर येऊन ठेपले आहे. मात्र यातच डोंबिवलीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम येथील आनंदी कला केंद्र येथील कारखान्यातील मूर्तीकार पसार झाला आहे. त्याचा फोनही बंद येत आहे. महात्मा फुले रोडवरील या कारखान्यात अनेकांनी गणेश मूर्ती बूक केली होती परंतु ऐनवेळी या सर्व डोंबिवलीकरांवर विघ्न आले आहे.
याबाबत एका गणेश भक्ताने सांगितले की, आम्ही एक दीड महिन्यापूर्वी मूर्ती बुकिंग केली होती. काल संध्याकाळी मी कारखान्यात आलो तेव्हा सकाळपर्यंत मूर्ती तयार होईल असं त्याने सांगितले आणि आता तो गायब झाला आहे. मला व्हॉट्सअपवर माहिती मिळाली, इथला मालक फरार झाला. ऐनवेळी मला आता दुसरीकडे मूर्ती तातडीने बुक करावी लागणार असं त्याने म्हटलं.
तसेच आणखी एका भक्तानेही कारखान्याला भेट दिली तेव्हा तिथे कुणीही नव्हते. एक महिन्यापूर्वी मूर्ती बुकिंग केली, त्याचे साडे तीन हजार रूपयेही दिले होते. आम्ही मागील ४ दिवसांपासून रोज फेऱ्या मारत होतो. मूर्ती बनली की नाही हे विचारत होतो तरी तो होईल होईल असंच बोलत राहिला. माझ्यासारखे अनेक जण इथे आलेत. त्या सगळ्यांनी पैसे भरले होते. आता इथल्या दोघांचेही नंबर स्वीच ऑफ लागत आहेत आहेत असा आरोप करण्यात आला. यावेळी संतप्त गणेश भक्तांनी दिसेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जातानाचे चित्र दिसून आले.
दरम्यान, जास्त मूर्तींची बुकिंग घेऊन काम वेळेत पूर्ण न झाल्याने इथला मूर्तीकार पसार झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. इथल्या कारखान्यातील एका कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आनंदी कला केंद्र येथे घरगुती गणेश मूर्ती बनवल्या जात होत्या मात्र क्षमतेपेक्षा जास्त बुकिंग आणि कामाचा ताण वाढल्याने वेळेत मूर्ती देणे कठीण झाले. त्यातूनच इथले मालक फरार झाल्याने गणेश भक्त चांगलेच संतापलेले आहेत.