'बिनविरोध निवड' हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर; विरोधकांनी लढाईपूर्वीच सोडलं मैदान? सत्ताधारीच सत्तेसाठी 'लढणार'...
By संदीप प्रधान | Updated: January 5, 2026 10:37 IST2026-01-05T10:37:27+5:302026-01-05T10:37:27+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याने या महापालिकेत भाजपने आपला महापौर बसवला तर आश्चर्य वाटायला नको.

'बिनविरोध निवड' हा लुटुपुटुच्या लढाईचा ट्रेलर; विरोधकांनी लढाईपूर्वीच सोडलं मैदान? सत्ताधारीच सत्तेसाठी 'लढणार'...
ठाणे-कल्याण डोंबिवली, संदीप प्रधान, सहयोगी संपादक
ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेचे २७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यांच्या विरोधातील उद्धवसेना, मनसे, काँग्रेस आदी पक्षांच्या उमेदवारांनी रिंगणातून पळ काढला किंवा त्यांना पळ काढण्यास भाग पाडले गेले. महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि दीर्घकाळानंतर त्या होत असताना विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी रिंगण सोडणे हे धक्कादायक व लोकशाही प्रक्रियेला पोषक नाही. ठाणे व कल्याण-डोंबिवली हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गड. ठाण्यात शिंदे यांनी आपले सात उमेदवार बिनविरोध विजयी केले. कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तब्बल १४ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याने या महापालिकेत भाजपने आपला महापौर बसवला तर आश्चर्य वाटायला नको.
ठाणे, कल्याण-डोंबिवली या दोन्ही ठिकाणी युती करायची की, स्वबळावर लढायचे यावरून भाजप-शिंदेसेनेत बरीच खडाखडी सुरू होती. डोंबिवलीतील शिंदेसेनेचे चार नगरसेवक भाजपने गळाला लावले आणि वाद दिल्लीपर्यंत गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी युती करण्याचे आदेश दिले. वाटाघाटीत ठाण्यात भाजपला जेमतेम ४० जागा शिंदेसेनेने दिल्या. त्यातही नऊ जागा या कळवा-मुंब्रा येथील आहेत. येथे भाजप कमकुवत आहे. डोंबिवलीतील फोडाफोडीचा जणू शिंदेसेनेनी वचपा काढला, असे म्हटले तर गैरलागू ठरणार नाही. मात्र, कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खा. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ. यातील अंबरनाथ व बदलापूर या नगरपालिकांत भाजपने आपले नगराध्यक्ष बसवून श्रीकांत यांना हिसका दाखवला. पाठोपाठ डोंबिवलीत १४ नगरसेवक बिनविरोध विजयी करून भाजपने आपली ताकद दाखवून दिली. याच वेगाने भाजपने कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर परिसरात हातपाय पसरले तर भविष्यातील लोकसभा निवडणुकीकरिता श्रीकांत यांना भाजपच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागेल.
बंडखोर हे मित्रांवर चालवलेले हत्यार?
ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश बंडखोरांना खाली बसवण्यात भाजप-शिंदेसेनेला यश आले आहे. दोन्ही पक्षांतील जे १२ ते १३ बंडखोर ठाण्यात आणि जवळपास तेवढेच कल्याण-डोंबिवलीत रिंगणात आहेत, त्यांना या पक्षाच्या नेत्यांचीच फूस आहे, असा संशय घ्यायला वाव आहे. महापौर कुणाचा बसणार, यावरून भाजप-शिंदेसेनेत चुरस आहे. कदाचित आपल्या बंडखोराला रसद पुरवून विजयी करायचे आणि मित्रपक्षाच्या उमेदवाराला धूळ चारून महापौरपद काबीज करायचे या डावपेचांचा हा भाग आहे. विरोधकांनी लढाईपूर्वीच मैदान सोडल्यासारखी परिस्थिती आहे. सत्ताधारी पक्ष आपापसात लढणार आणि सत्ता मिळवणार, असेच संकेत आहेत.
राजकारणावर अर्थकारण भारी
देशात जेव्हा काँग्रेस सर्वदूर पसरली होती तेव्हा डावे, उजवे, समाजवादी वगैरे कमकुवत होते. त्यांच्याकडे घोडेगाड्या, कार्यालये, पैसा यांचा अभाव होता. मात्र, लढण्याची जिद्द व चिकाटी होती.
विरोधकांना तेव्हा लोकल, बसने प्रवास करायची लाज वाटत नव्हती. आता सुईच्या अग्रावर राहील इतकीसुद्धा सत्ता नसलेल्या पक्षाचे नेते हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसारखेच गाडीघोडे घेऊन फिरतात. महापालिका या दुभत्या गायी आहेत.
वेगवेगळ्या महापालिकांत गोल्डन गँग कार्यरत होत्या.
अंडरस्टँडिंग कमिटीच्या माध्यमातून आपल्याच निकटवर्तीयांकरिता कंत्राटे मिळवायची, आपल्या वॉर्डातील बांधकामांमध्ये बिल्डरांसोबत पार्टनरशिप करायची, असे खुलेआम सुरू आहे. सत्ताधाऱ्यांइतकेच बरबटलेले विरोधी पक्षातील नेते लढू शकत नाहीत. तेच या महापालिकांतील बिनविरोध निवडीमागील इंगित आहे.
ठाकरे बंधूंचे सपशेल दुर्लक्ष
मुंबई महापालिका जिंकण्याकरिता उद्धव-राज ठाकरे जिवाचे रान करतायत. मराठी माणसाची मुंबई गिळंकृत केली जाऊ नये वगैरे भाषणांचा रतीब घातला जातोय; परंतु मुंबईतील मराठी माणूस ज्या उपनगरातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूरमध्ये फेकला गेलाय तेथील महापालिकांकडे या बंधूंचे सपशेल दुर्लक्ष आहे. जणू हा परिसर त्यांनी भाजप व शिंदेसेनेला आंदण दिलाय. डोंबिवली ही उद्धव यांची सासुरवाडी; पण ना स्वत: उद्धव, ना त्यांचे पुत्र आदित्य येथे प्रचाराला फिरकत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंनी या भागाकडे जवळपास पाठ फिरवली होती. राज ठाकरे यांचेही जवळपास तसेच. राजू पाटील या सुभेदाराकडे हा सुभा त्यांनी सोपवला आहे. येथील अनेक साथीदार ठाकरेंना सोडून गेले. येथील शाखा शिंदेसेनेने ताब्यात घेतल्या; परंतु त्याचे सोयरसूतक ठाकरे बंधूंना नाही.
मनसेचा शहराध्यक्ष भाजप उमेदवाराकरिता माघार घेतो, तर उद्धवसेनेचा शहराध्यक्ष उमेदवारी न मिळाल्याने अंथरूण धरून बसलाय हे येथील वास्तव आहे. आता नेत्यांचे हे वर्तन असेल तर त्यांच्यासोबत या कठीण परिस्थितीत टिकून असलेल्यांनीच काय सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्याचा पण केलाय? त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिलेली असतानाही अनेकांनी सत्ताधाऱ्यांच्या ‘मैत्री’ला जागत माघार घेतली. जवळपास अशीच परिस्थिती ठाण्यात व अन्य महापालिकांतही आहे. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारी भाजप व शिंदेसेना हे लुटुपुटुच्या लढाईसारखे लढणार व जिंकणार, हे स्पष्ट दिसत आहे.