भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विजयी; केडीएमसीत दाेघींविरोधात उमेदवारी अर्जच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:21 IST2026-01-01T15:19:57+5:302026-01-01T15:21:40+5:30
... तर पनवेलमध्ये याच पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.

भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विजयी; केडीएमसीत दाेघींविरोधात उमेदवारी अर्जच नाही
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यापैकी दोन उमेदवारांविरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांना ही लॉटरी लागली. तर पनवेलमध्ये याच पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीत रेखा राजन चौधरी (पॅनल क्रमांक १८-अ), आसावरी केदार नवरे (पॅनल क्रमांक २६-क), रंजना मितेश पेणकर (पॅनल २६-ब) हे भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामधील पेणकर या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नगरसेवक असतानाच्या सावरकर रोड या प्रभागातून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. नवरे, चौधरी यांच्यासमोर एकही उमेदवार अर्ज न आल्याने त्यांचा विजय झाला. तर, पेणकर यांच्यासमोर एका अपक्ष महिलेने अर्ज केला होता, तो अर्ज छाननीमध्ये बाद ठरवण्यात आल्याने त्यांचा विजय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्हिडीओ कॉल करून विजयी उमेदवारांची ओळख करून दिली.
शेकापचा अर्ज बाद; नितीन पाटील यांना लॉटरी
पनवेल प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपचे नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने पाटील विजयी झाले. पाटील याआधी महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. गावंड हे एकेकाळी भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांचे स्वीय सहायक होते.