उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:04 IST2025-12-30T15:04:58+5:302025-12-30T15:04:58+5:30
काहींनी उल्हासनगरचे सिंगापूर करण्याची कल्पना भरारी मारली, तर काहींनी डोंबिवलीचे शांघाय करण्याचा विडा उचलला आहे.

उमेदवारांच्या मदतीला धावून आले गुगल, एआय अन् माध्यम सल्लागार
उल्हासनगर / डोंबिवली : महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘आपल्या संकल्पनेतील शहर’ या विषयावर १०० ते ५०० शब्दांपर्यंत ‘निबंध’ लिहायचा असल्याने शाळेत निबंधाचा प्रश्न ऑप्शनला टाकणाऱ्या काही उमेदवारांची पंचाईत झाली आहे. अनेक उमेदवारांनी गुगलवर सर्च मारून किंवा एआयच्या मदतीने निबंध लेखन केले. अनेक उमेदवारांचा निबंध त्यांचे खासगी सचिव किंवा माध्यम सल्लागार यांनी लिहून दिला.
सिंगापूर करण्याचा संकल्प -
काहींनी उल्हासनगरचे सिंगापूर करण्याची कल्पना भरारी मारली, तर काहींनी डोंबिवलीचे शांघाय करण्याचा विडा उचलला आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवाराला त्याच्या प्रभागाबद्दल काय वाटते, याबाबत
१०० ते ५०० शब्दात लेखी व्हिजन मागवले आहे.
उल्हासनगर या अहोरात्र जागणाऱ्या
व उद्योगप्रिय शहरात घराघरात लहान - मोठे उद्योग सुरू आहेत.
कल्पनांचे फुलोरे
अवघ्या १३ कि. मी. क्षेत्रफळाच्या शहरात ८ ते ९ लाख लोकसंख्या आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल करणाऱ्यांनी शहराला समस्यामुक्त करून सिंगापूर करण्याचा पण निबंधात केला आहे. काही उमेदवारांना
त्यांनी लिहिलेल्या निबंधाबद्दल विचारले असता त्यांनी गुगल सर्च करून माहिती घेतल्याची कबुली दिली. एआयच्या माध्यमातून काहींनी कल्पनांचे फुलोरे काढले.
अर्ज दाखल करताना ‘आपल्या संकल्पनेतील शहर’ या विषयावर ‘निबंध’ लिहायचा आहे.
या मुद्यांवर लिहिले निबंध -
डोंबिवलीत भाजप, शिंदेसेना व अन्य पक्षांच्या उमेदवारांनी निबंधात कल्याण - डोंबिवलीकरिता स्वतंत्र धरण, प्रदूषणमुक्त प्रभाग या मुद्यांवर भर दिला. मनसे, उद्धव सेनेच्या उमेदवारांनी शहरातील वाहतूककोंडी, धूळ, अनधिकृत बांधकामे, क्लस्टर यांसह खाडी प्रदूषण अशा मुद्यांवर निबंध लिहिले आहेत.
सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर
प्रभागात सत्ताधाऱ्यांनी काही केले नसल्याने परिवहन सेवा, वाचनालय, स्वच्छतागृह, आपला दवाखाना, पालिका शाळा, रिक्षा स्टँड, डासमुक्त प्रभाग, फेरीवाला, चौक सुशोभिकरण, गतिरोधक, रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त, भाजी मंडई आदी मुद्यांवर मते व्यक्त करताना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. कल्याण ऐतिहासिक शहर असल्याने त्यादृष्टीने विकास करणे, काळा तलाव, दुर्गाडी किल्ला, डॉ. आनंदी जोशी स्मारक अशा मुद्यांवर तेथील उमेदवारांनी भर दिला.