उमेदवारी नाकारल्यानेच अख्खे कुटुंब शिंदेसेनेत, उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यावर केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:11 IST2026-01-02T17:10:14+5:302026-01-02T17:11:02+5:30
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर यांची मुलगी प्राजक्ता ही पॅनल क्रमांक ४ मधून इच्छुक होती. मात्र, पक्षाच्या उपनेत्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेवक काटकर यांनी त्यांची मुलगी प्राजक्ता, पत्नी रोहिणी तसेच काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सलीम काजी यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला.

उमेदवारी नाकारल्यानेच अख्खे कुटुंब शिंदेसेनेत, उद्धवसेनेच्या स्थानिक नेत्यावर केले आरोप
कल्याण - उद्धवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर यांची मुलगी प्राजक्ता ही पॅनल क्रमांक ४ मधून इच्छुक होती. मात्र, पक्षाच्या उपनेत्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या माजी नगरसेवक काटकर यांनी त्यांची मुलगी प्राजक्ता, पत्नी रोहिणी तसेच काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष सलीम काजी यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेसेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या उपस्थितीत मोहने शाखेत हा प्रवेश पार पडला.
ऐनवेळी तिकीट नाकारल्यांनी अन्य पक्षांत प्रवेश केल्याने निष्ठावंत नाराज झाले.
पैसे देण्यासही होतो तयार
काटकर यांच्यासह मुलगी प्राजक्ता यांनी आरोप केला की, उद्धवसेनेकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी त्यांची उमेदवारी कापली. उमेदवारी हवी असल्यास पैसे द्यावे लागतील. आम्ही पैसे देण्यासही तयार होतो. मागच्या निवडणुकीतही सर्व सिटिंग नगरसेवकांना उमेदवारी दिली गेली. केवळ काटकर यांची उमेदवारी कापली होती. पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याविषयी आम्हाला काही एक तक्रार नाही. साळवी यांच्यामुळे उद्धवसेना सोडल्याचे काटकर कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, उद्धवसेनेचे उपनेते साळवी यांच्याकडे विचारणा केली असता सांगितले की, सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली. त्यामुळे काटकर कुटुंबीयांचे आरोप चुकीचे आहेत.