केडीएमसीत महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली; तर काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:07 IST2025-12-30T11:05:28+5:302025-12-30T11:07:15+5:30
...मनसे ५४ तर उद्धवसेना ६० जागा लढविणार असे सूत्र होते. त्यापैकी उद्धवसेनेने त्यांच्या ६० जागांच्या कोट्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना जागा द्यायच्या होत्या. काँग्रेसने २५ जागांची मागणी केली होती.

केडीएमसीत महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली; तर काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढणार
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेची निवडणूक मनसे, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्रित लढणार होते. मात्र, जागावाटपावरून गणित फिस्कटले. आता मनसे आणि उद्धवसेना एकत्रित लढणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढणार आहेत.
पालिका निवडणूक जाहीर होताच मनसे, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीत मनसे नेते राजू पाटील, उद्धवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी जागावाटपाचे गणित ठरविले. मनसे ५४ तर उद्धवसेना ६० जागा लढविणार असे सूत्र होते. त्यापैकी उद्धवसेनेने त्यांच्या ६० जागांच्या कोट्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना जागा द्यायच्या होत्या. काँग्रेसने २५ जागांची मागणी केली होती. ही मागणी उद्धवसेनेने मान्य केली नाही. ६० पैकी २५ जागा काँग्रेसला दिल्या तर राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या वाट्याला जागा उरणार नाही. या मुद्द्यावरून बोलणी फिस्कटली.
काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि वंचित या नव्या आघाडीत काँग्रेस ७०, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि वंचित बहुजन आघाडीला १५ जागा देण्याचे गणित ठरले. रात्री उशिरापर्यंत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
शिंदेसेनेच्या उमेदवारांना रात्रीतून दिले एबी फॉर्म -
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या मंगळवार हा अंतिम दिवस असल्याने सोमवारी रात्री बहुतेक पक्ष आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करतील. शिंदेसेनेने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता सोमवारी रात्री एबी फॉर्मचे वाटप करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत सर्वच उमेदवारांच्या हातात एबी फॉर्म पडलेला असेल.
कल्याण-डोंबिवलीतून महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून ५०० हुन अधिक उमेदवार इच्छुक होते. कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व पश्चिमेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या आदल्या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते.