झेंडू हसला ...अन  व्यापाऱ्यांना 'बाप्पा पावला' ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 04:48 PM2021-09-09T16:48:59+5:302021-09-09T16:53:24+5:30

गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली 

demand increased of flowers in market ganeshotsav | झेंडू हसला ...अन  व्यापाऱ्यांना 'बाप्पा पावला' ! 

झेंडू हसला ...अन  व्यापाऱ्यांना 'बाप्पा पावला' ! 

googlenewsNext
ठळक मुद्देगणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली 

मयुरी चव्हाण 
कल्याणच्या कृषी  उत्पन्न बाजारातील फुल मार्केटमधील  ही फुलं आज आनंदाने बहरून आलीये. कारण कोरोना संकटामुळे  फुल बाजाराला तुरळकच ग्राहक यायचे. ग्राहकांच्या प्रतीक्षेत ही फुलं असायची. अखेर कंटाळून निराशेन ही फुलंही कोमेजून जायची आणि फुलं व्यापारीही फुलांकडे पाहून हताश व्हायचे! मात्र  गुरुवारी अवघ्या फुल बाजारातील ताजी टवटवीत फुलं खळखळून हसत जणू काही ग्राहकांच स्वागत करत असल्याचं चित्र होत. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी  सकाळपासून  विविध प्रकारची फुल खरेदी  करण्याला प्राधान्य दिलं. इतर दिवसांपेक्षा बाजर भावही चांगला मिळाल्यानं  बाप्पा पावला अशा भावना फुल विक्रेत्यांनी व्यक्त केल्या. सर्व फुलांमध्ये पिवळ्या झेंडूला जास्त मागणी असल्यानं  झेंडूच्या फुलांचा तोरा बाजारात काही औरच होता.

पावसामुळे  शेतकऱ्यांचे  नुकसान झालं , मंदिर बंद असल्याचा परिणामही  विक्रीवर झाला. मात्र एरवी पेक्षा गणेशोत्सवामुळे  आता फुलांच्या  भावामध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्यानं शेतकरी आणि व्यापारी या  दोघांनाही काहीसा दिलासा मिळालाय. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या  संकटात सापडलेल्या फुल बाजाराला गणेशोत्सवामुळे खऱ्या अर्थानं तेजी मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात सुमारे १५० टन फुलांच्या विक्रीचा अंदाज  व्यक्त करण्यात आलाय. कवडीमोल किंमतीला फुलं विकावी लागत असल्यानं अनेकदा  बळीराजाने  व्यथित होऊन फुलं  रस्त्यावर फेकली.  व्यापाऱ्यांवर ही तीच वेळ आली. मात्र आता मार्केट मधये काहीसं सकारात्मक चित्र असून एरवी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या फुलांना "फुल टू डिमांड" आल्यानं  फुल आणि फुलांचे व्यापारी दोघही खुश आहेत.

फुल                      भाव  ( प्रति किलो).
 
पिवळा झेंडू             ५० -६० 

लाल झेंडू                  ६० 

पांढरी शेवंती             ६० 

पिवळी शेवंती            ८०-१००

तुका                         १००

कापरा                      ५० 

गुलछडी                    ३०० -४००

कोरोनामुळे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. ग्राहक मार्केट मध्ये फारसे फिरकत नसल्यानं हताश होऊन  फुलं अक्षरशः फेकून देण्याची नामुष्की अनेकदा आली. गणेशोत्सवामुळे आज फुलांची मागणी वाढली असून व्यापा-यांना बाप्पा पावला आहे. 
भाऊ नरवडे, फुलांचे व्यापारी  

पवसामुळे शेतकऱ्यांच नुकसान झालं. मंदिर बंद असल्यानं थोडा फटका विक्रीला बसत आहे. मात्र मागील काही काळ पाहता आज  ग्राहकांची  गर्दी झाली असून पिवळ्या झेंडूला जास्त मागणी आहे.  खूप दिवसांनी बाजारभावही  चांगला मिळत असल्यानं व्यापा-यांना बाप्पा पावला आहे. 
बाळासाहेब गायकवाड, फुलांचे व्यापारी

Web Title: demand increased of flowers in market ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.