अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
By अनिकेत घमंडी | Updated: January 12, 2026 06:51 IST2026-01-12T06:51:13+5:302026-01-12T06:51:31+5:30
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेबंधूंची युती असली तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे उमेदवारांकडे लक्ष नाही

अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
अनिकेत घमंडी
भाजपने बदलापूर, अंबरनाथ येथे आपले भानगराध्यक्ष निवडून आणले. आता कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याकरिता डोंबिवलीतील ३७ उमेदवारांपैकी १४ जणांना बिनविरोध निवडून आणले. त्यामुळे 'अंबरनाथ तो झाँकी है डोंबिवली-कल्याण बाकी है,' अशी अप्रत्यक्ष घोषणाच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचे संकेत त्यांच्या प्रत्येक कृतीतून मिळत आहेत. ठाण्यात जागावाटपात चिंचोके हातावर ठेवणाऱ्या शिंदेसेनेला केडीएमसी निवडणुकीत खिंडीत पकडण्याची खेळी भाजप खेळला आहे.
जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आणून भाजपने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कल्याण-डोंबिवलीकडे वेधले. शिंदेसेनेनेही त्यांचे सहा उमेदवार बिनविरोध आणले. त्यामागच्या घोडेबाजाराची चर्चा सर्वत्र सुरू असून, विरोधकांनी तो सभांचा मुद्दा बनवला आहे.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेबंधूंची युती असली तरी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे उमेदवारांकडे लक्ष नाही. त्यामुळे युती असूनही निकालानंतर सत्तास्थापनेची खरी लढत भाजप व शिंदेसेनेत होणार, हे चित्र दिसत आहे. रा. स्व. संघ परिवारातील दोन महिला उमेदवारांना संधी देऊन चव्हाण यांनी संघाला चुचकारले. तिकीटवाटपात घराणेशाही टाळली आणि मातब्बरांचे तिकीट कापले.
कल्याण पूर्वमध्ये नऊ आणि पश्चिमेला १० उमेदवार देताना आधी रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका झाली असली तरी त्यांनी सर्वाधिक बिनविरोध उमेदवार निवडून आणल्याने त्यांची खेळी भाजपला मजबूत करण्यासाठी असल्याची चर्चा राज्यभर सर्वत्र सुरू आहे.
भाजपचा स्ट्राइक रेट उंचावून ठेवण्यासाठी चव्हाण यांनी डोंबिवलीमध्ये भाजपला जास्तीत जास्त उमेदवार मिळवून दिले. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत नागपूर, वर्षा बंगला, ठाणे येथे झालेल्या चारही बैठकांत आक्रमक, आग्रही भूमिका घेतली. त्यांची ती भूमिका किती फलदायी ठरते, हे आता १६ जानेवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
सध्याचे चित्र काय ?
डोंबिवलीत पॅनल २९ मध्ये भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आहे. तेथे युती नाही. पॅनल २५, २३ मध्ये भाजपला मनसेचे आव्हान आहे. डोंबिवलीत पॅनल २६ सह अन्य दोन ठिकाणी पक्षाचे अवघे एक उमेदवार रिंगणात असून त्यांच्यासमोर अपक्ष, मनसेचे आव्हान आहे. कल्याणमध्ये शिंदेसेनेसोबत भाजपचे उमेदवार आहेत. डोंबिवलीमध्ये भाजप आणि कल्याणमध्ये शिंदेसेनेचा प्रभाव असेल, असेराजकीय जाणकारांचे मत आहे.
महापौरपदासाठी आग्रह?
इच्छा नसतानाही चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेनेशी युती केली असली तरी आता निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा महापौर बसवावा, हीच चव्हाण यांची प्रमुख मागणी असेल.