उमेदवारी अर्ज भरताय? मग हे सव्यापसव्य करायला राहा तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:05 IST2025-12-29T17:04:13+5:302025-12-29T17:05:02+5:30
एकसंघ शिवसेनेपासून उमेदवारी अर्ज भरताना घ्यायच्या खबरदारीबाबत जाणकार असलेले व ३५ वर्षांचा या कामाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेले शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर यांची भेट घेतल्याखेरीज उमेदवारांचा अर्ज सादर होणार नाही.

उमेदवारी अर्ज भरताय? मग हे सव्यापसव्य करायला राहा तयार
मुरलीधर भवार -
कल्याण : महापालिका निवडणुकीत उमेदवारी हवी असलेल्या अनेकांना आपला उमेदवारी अर्ज बाद होऊ नये, याकरिता कोणकोणती कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज कसा भरणे आवश्यक आहे, याची माहिती नसते. एकसंघ शिवसेनेपासून उमेदवारी अर्ज भरताना घ्यायच्या खबरदारीबाबत जाणकार असलेले व ३५ वर्षांचा या कामाचा दांडगा अनुभव गाठीशी असलेले शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर यांची भेट घेतल्याखेरीज उमेदवारांचा अर्ज सादर होणार नाही.
कल्याण पूर्वेत बुधवारी शिंदेसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी देवळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?, कोणती काळजी घ्यावी ?, याची माहिती इच्छुक उमेदवारांंना दिली. देवळेकर यांनी सांगितले की, ज्या प्रभागातून उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्या प्रभागाच्या यादीतील मतदार यादीत त्याचे नाव आहे. त्याचे नाव त्या प्रभागात नसेल आणि अन्य प्रभागाच्या मतदार यादीत असेल, तर त्याने जम्पिंग फॉर्म भरला पाहिजे. तो निवडणूक यंत्रणेकडे सादर केला पाहिजे. त्यांच्याकडून साक्षांकित प्रत घेतली पाहिजे.
दोनच अपत्य असणे आवश्यक
उमेदवाराच्या घरी शौचालय आहे की नाही, याची माहिती त्याला द्यावी लागणार आहे. प्रभाग अधिकाऱ्याकडून त्याचे प्रमाणपत्र घ्यावे. उमेदवाराला बँकेत झिरो बॅलन्स अकाऊंट उघडून त्याच्या पासबुकची छायांकित प्रत द्यावी लागणार आहे. बँकेत किती पैसे जमा आहेत?, रोख रक्कम किती आहे?, किती ठिकाणी वित्तीय गुंतवणूक आहे? गाडी, बंगला, घराचा तपशील द्यावा लागणार आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची तपशीलवार माहिती सोनाराकडून करून घेणे.
त्याची पावती लिहून घेणे आणि ती उमेदवारी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. प्रभाग आरक्षित असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रोज खर्चाचा तपशील द्यावा लागणार आहे. खर्चाची मर्यादा ११ लाख रुपये आहे. रोखीने अडीच हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येतो. बाकी सगळे व्यवहार हे धनादेशाद्वारे करावे लागणार आहेत. त्याचा तपशील द्यावा लागणार आहे.
उमेदवाराला दोनच अपत्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवार आणि त्याच्यावर अवलंबित असलेल्यांनी बेकायदा बांधकाम केलेले नसावे. ११ लाख निवडणूक खर्चाची मर्यादा ही निवडणूक आयोगाने कोणत्या निकषांच्या आधारे ठरविली आहे, याची पक्ष आणि इच्छुक उमेदवारांना कल्पना नाही. या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर उमेदवारी अर्ज भरावा. त्याचबरोबर पोलिसांकडून व्हेरिफिकेशन करावे लागते. त्यासाठी पोलिसांनी एक खिडकी योजना सुरू केली आहे. गुन्हा दाखल नसेल, तर काही लिहायचे नाही.
... तर उमेदवार बिनविरोध निवडून येईल
गुन्हे दाखल असतील, तर पोलिसांकडून मिळालेला तपशील त्याठिकाणी नमूद करून त्याची प्रत जोडायची. या सगळ्यांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे जास्त लक्ष असते. उमेदवारी अर्ज छाननीत आक्षेप घेतल्यास अर्ज बाद होऊ शकतो. ऐनवेळेस कागदपत्रांची जुळवाजुळव झाली नसल्यास उमेदवारी अर्ज भरला न गेल्याने एकच अर्ज प्राप्त झाल्यास त्याठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो, या शक्यता देवळेकर यांनी सांगितल्या आहेत.