Who will fight the Giants in the polls? | दिग्गजांना निवडणुकीत भिडणार कोण?
दिग्गजांना निवडणुकीत भिडणार कोण?

-गिरीश महाजन, जयकुमार रावळ, एकनाथराव खडसे यांच्याविरुध्द उमेदवार देताना काँग्रेस आघाडीची कसोटी
-भाजप-शिवसेना युती निश्चित असली तरी जागावाटपाचे घोडे अडले असल्याने मतदारसंघांमध्ये अनिश्चितता कायम

मिलिंद कुलकर्णी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगित झालेली महाजनादेश यात्रा या आठवड्यात खान्देशात येत आहे.यावेळी काही इतर पक्षीयांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. मात्र बरेच जण अजून कुंपणावर बसून आहेत. भाजप-शिवसेनेची युती होते काय? झाली तर जागावाटप काय होते? २००९ चा निकष पाळायचा की, विद्यमान आमदार ज्या पक्षाचा ती जागा त्याला असे धोरण ठरवायचे याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने काहींचे पाय उंबरठ्यावर अडले आहेत. स्पष्टता व्हायला वेळ लागेल.
विधानसभा निवडणुकीचे पडघम आता गावपातळीवर वाजू लागले आहेत. मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, युवा नेत्यांच्या यात्रा राज्यभर फिरु लागल्याने लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवारदेखील आपल्या मतदारसंघात यात्रा काढत आहेत. कुणी मोठाले कार्यक्रम घेत आहेत तर काहींनी आरोग्य शिबिरांचा धडाका लावला आहे. मतदाराला आरोग्य, सांस्कृतिक, वैचारिकदृष्टया समृध्द करण्याचा विडा जणू राजकीय मंडळींनी उचलला असल्याचे वातावरण खान्देशात दिसून येत आहे. पाच वर्षांनंतर मतदाराला पुन्हा महत्त्व आल्याने तोही या सगळ्यांचा आनंद घेतोय. काहींची पंढरपूर, काहींची अष्टविनायक यात्रादेखील चातुर्मासात घडून आलीय. हे पुण्य वेगळेच असते.
खान्देशातील २० मतदारसंघाचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. २०१४ चे बरेचसे उमेदवार पुन्हा रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झालेले असले तरी ते कोणत्या पक्षातर्फे उभे राहतील हे ठरलेले नाही. त्यात हमखास बदल होऊ शकतो, अशी काही मतदारसंघातील तरी स्थिती आहे.
दिग्गज उमेदवारांच्या मतदारसंघातील हालचालींकडे संपूर्ण खान्देशचे लक्ष लागलेले आहे. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात संजय गरुड हे आता तयारीला लागले आहेत. इतर इच्छुक असले तरी गरुड यांचा दावा भक्कम ठरु शकतो.
मात्र संपूर्ण मतदारसंघावर पकड असलेल्या महाजनांना आव्हान देणे तेवढे सोपे नाही, याची जाणीव सर्वच पक्षीयांना आहे. २०१४ मध्ये खडसे यांच्या विरोधात जसे सगळे एकत्र झाले होते, तसे यावेळी महाजनांच्या विरोधात सगळे एकत्र येतील, असे चित्र आहे. अर्थात राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांनी अलिकडे पुन्हा एकदा महाजन यांना जाहीर पाठिंबा दिलेला असल्याने राष्टÑवादी एकसंघ असल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जात नाही.
जयकुमार रावळ यांच्याविरोधात देखील असेच सगळे एकत्र येतील. संदीप बेडसे यांची दावेदारी मजबूत आहे. डॉ.हेमंत देशमुख यांच्या अडचणी वाढल्याने ते निवडणुकीत कितपत सक्रीय राहतात, यावर विरोधकांची रणनीती अवलंबून राहील.
मुक्ताईनगरकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. रोहिणी नव्हे, मीच इच्छुक असे घोषित करुन खडसे यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रोहिणी यांच्या नावाची चर्चा नेमकी सुरु केली कोणी आणि त्यामागील हेतू काय हे समोर आले नसले तरी खडसे यांना अजूनही पक्षांतर्गत संघर्ष कायम आहे, हे स्पष्ट झाले आहे.
अनिल गोटे, हरिभाऊ जावळे, डॉ.सतीश पाटील, डॉ.विजयकुमार गावीत, अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्याविरुध्द प्रतिस्पर्धी कोण असेल अशी उत्सुकता कायम आहे. तुल्यबळ उमेदवाराचा शोध सर्वच पक्षांकडून सुरु असल्याने लढती रंगतील, हे मात्र निश्चित.
एकनाथराव खडसे सातव्यांदा, गिरीश महाजन सहाव्यांदा तर जयकुमार रावळ चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. त्यांच्याविरुध्द वेगवेगळ्या उमेदवारांनी भविष्य अजमावले आहे, पण काही मोजके उमेदवार सोडले तर ते तुल्यबळ लढत देऊ शकले नाही. राज्य, जिल्ह्याचे राजकारण किती बदलले तरी या दिग्गज उमेदवारांची त्यांच्या मतदारसंघातील पकड कमी झालेली नाही. मात्र रोहिदास पाटील, सुरुपसिंग नाईक, सुरेशदादा जैन या दिग्गजांच्या नावावर विक्रम असला तरी त्यांना एकदा पराभवाची चव चाखावी लागली आहे.

Web Title:  Who will fight the Giants in the polls?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.