वेदातले समंत्रक शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 15:26 IST2019-07-06T15:25:40+5:302019-07-06T15:26:58+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘नित्य नवे वेद’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील

वेदातले समंत्रक शब्द
वेदिक काळात पाणी वहाण्यासाठी पखाली होत्या. ऋषी म्हणतो की, हे देवा, पखालीचे मुख खुले करा. पाऊस असा बदाबदा पडतो. पावसाच्या या धारांंनी धरणीला कंठ फुटतो. इथली बेडकंही मग गाणी गाऊ लागतात. गावातील, रानातील तळी समृद्ध होतात. ती गाऊ लागतात. यासोबत गाय-वासरांचे ध्वनी निनादतात. शेळ्या-कोकरांचा स्वर नाद वातावरणाला भारून टाकतो. पाऊस असा पावसाळाभर येतच राहतो. पाणी देवाजीच्या करूणेसारखं वाहू लागतं. नद्या-नाल्यांना पूर येतात. ओढे खळाळू लागतात. जनावरं पुष्ट होतात. भरपूर पाऊस होतो. धनधान्याची सुबत्ता नांदते. प्रार्थनेचा स्वर जागतो. हे पर्जन्य देवा, भरल्या मनानं ये. तू आता कोरड्या दिशांचा माग घे. कोरड्या दिशांना जा. केवळ आपल्यापुरतीच ही प्रार्थना नाही. या प्रार्थनेला सार्वत्रिक तेचा असा सहज स्पर्श आहे. खरी प्रार्थना पर्जन्यदेवही अर्थातच् ऐकून घेतो. आपल्याच लाभाचा लोभ न धरणारा माणूस त्याला आवडतो. तो पुढं निघून जातो. मागे वहात्या नद्या सोडून जातो. मग नद्याच माता बनतात. आई बनतात. करूणानिधान बनतात.
वेद ज्ञानाचं साधन. वेद संवेदनेचा विषय. अनेकदा आपण वाचतो. ते सारं समजलेलं असतंच असं नाही. वेदाचा हा महिमा आहे. जे कळलं ते प्रकट करून सांगता यायला हवंय. जे जाणून घेतलं ते समजावता यायला हवं. ते जगून दाखवता यायला हवं. आत्मप्रकटीकरणाची विद्या म्हणजे वेदविद्या. वेदातले शब्द अर्थघन. या शब्दात खूप अर्थ भरला आहे. जणू काही बरसणारा ढगच.
हे शब्द अर्थभारित घनासारखे तृप्त. एका प्रक्रियेनं या शब्दाचा एक अर्थ निघतो तर दुसऱ्या प्रक्रियेने वेगळा. दोघांमध्ये विरोधाचं काहीही कारण नाही. प्राण, वाणी आणि मन जुळलं की शब्द आकाराला येतो. यामुळे वेद हे प्राणमय आहेत. इंद्रीयमय आहेत. मनोमय आहेत. वेद म्हणजे शब्द ब्रह्म.
वेदाची भाषा कमालीची विनम्र आहे. वेद प्रत्यक्षात बोलत नाही. परोक्षात बोलतो. ‘हे करा.’ असं नाही सांगत. ‘असं करणं चांगलं.’ असं सांगतो. ‘असं करा. ‘हे नाही सांगत. ‘चला, असं करू या.’ हे सांगतो. ही शब्दकळा समजून घेऊ या. निनाद करणारी नदी. सर सर करणारी सरिता, गं गं करणारी गंगा. धारण करणारी धरणी. पसरलेली पृथ्वी. वैदिक शब्द अशाप्रकारे सूक्ष्म अर्थाचं वहन करतात. वेदातील साहित्याचा पोत जीवनधर्मी. ऋषी आणि कृषी संस्कृतीचा उद्गाता. इथं शेती आहे. गायी-गुरं आहेत. सूर्यदेव आहे. चंद्र सखा आहे. दाहक अग्नी येथे प्रेमळ बाप बनतो. तो झळाळत राहतो. तो न्यायाची ज्योत प्रदीप्त राखतो. छान-छान भेटी देतो.
सुखदायी ठरतो. सखा-सोबती होतो. अंधारगर्भ अशी रात्र सरते. उजळणारी उषा येते. आकाशाची बाळी धरणीपुत्राला भेटायला येते. ही स्वर्गाची कन्यका वाटते. ही भरल्या घरची लेक-सून वाटते. ही नटून-थटून असते. ही झगमगत्या रथातून येते. सूर्याचं एक नाव आहे आदित्य. दा म्हणजे देणारा, दाता. घेऊन जाणारा तो सूर्य. सूर्य काय बरं घेऊन जातो? तो आपल्या आयुष्याचा एक भाग घेऊन जातो. हे आपण लक्षात ठेवायला हवं. अस्ताला जाणारा सूर्य आपल्या आयुष्याचा एक खंड घेऊन जात असतो. धरणीचा आधार सत्य. आकाशाचा आधार सूर्य. (क्रमश:)
-डॉ.विश्वास पाटील, शहादा, जि.नंदुरबार