माजी महापौरांसह अनेकांना धक्का; 'एबी' फॉर्मचा पेच, महापालिकेत रात्री उशिरापर्यंत अर्जाची छाननी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:41 IST2026-01-01T12:40:22+5:302026-01-01T12:41:48+5:30
प्रभाग क्रमांक ६ 'अ' मध्ये जयश्री धांडे यांचा भाजपचा अर्ज बाद: प्रभाग १० 'ब' मध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने?

माजी महापौरांसह अनेकांना धक्का; 'एबी' फॉर्मचा पेच, महापालिकेत रात्री उशिरापर्यंत अर्जाची छाननी
जळगावः महापालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेत बुधवारी मोठ्या घडामोडी घडल्या. तांत्रिक चुका आणि राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले आहेत. यात भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे, उद्धवसेनेच्या डॉ. सुषमा चौधरी, नितीन जाधव यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रभाग १० 'ब' मध्ये महायुतीतील घटक पक्ष भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) या दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.
महापालिका निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनावर प्रचंड ताण होता. प्रत्येक अर्जाची तांत्रिक तपासणी, माहिती ऑनलाइन भरणे, प्रभागनिहाय याद्या तयार करणे यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक पहाटे २:३० वाजेपर्यंत काम करत होते. शेवटच्या दिवशी ७६३ तर अखेरपर्यंत एकूण अर्जाचा आकडा १०३८ वर पोहोचला. या अर्जाच्या डोंगरामुळे महापालिका प्रशासनाची पार तारांबळ उडाली आहे. निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे २:३० वाजेपर्यंत काम केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर, बुधवारी सकाळी ९ वाजता पुन्हा छाननी प्रक्रियेसाठी ते सर्व हजर झाले. निवडणूक निरीक्षकही दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडत आहे.
प्रभाग १० 'ब' मध्ये महायुतीत 'बिघाडी' की रणनीती?
सर्वात मोठी खळबळ प्रभाग १० 'ब' मध्ये पाहायला मिळत आहे. येथे महायुती असूनही दोन पक्षांचे अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या यादीत या जागेसाठी अतुल माधुरी बारी यांचे नाव आहे. दुसरीकडे, याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या लता अंबादास मोरे यांचा अर्ज मंजूर झाला आहे. लता मोरे यांच्याकडे राष्ट्रवादीचा अधिकृत 'एबी' फॉर्म असल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. मुळात महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या असताना सहावा 'एबी' फॉर्म कसा आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एबी फॉर्मवरील स्वाक्षरीचा उद्धवसेनेलाही फटका
प्रभाग ३ क आणि ९ 'अ' मध्ये उद्धव सेनेच्या डॉ. सुषमा चौधरी आणि नितीन जाधव यांचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यांच्याही 'एबी' फॉर्मवर आवश्यक स्वाक्षरी नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद ठरवला.
'फ्रेंडली फाईट'कडे लक्ष
प्रभाग १० ब मधील गोंधळाबाबत बोलताना पी. एस. पाटील यांनी लोकमत कार्यालयात येऊन आक्षेप नोंदवला आहे. जर ही जागा भाजपने लढवायची ठरली होती, तर छाननीच्या वेळी राष्ट्रवादीने आपला दावा सोडण्याबाबतचे अधिकृत पत्र देणे अपेक्षित होते, परंतु तसे पत्र दिले गेले नाही. त्यामुळे महायुतीमध्ये समन्वय आहे की एकाच जागेवर 'फ्रेंडली फाईट' होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छाननी प्रक्रियेत आक्षेपांचा धुरळा!
बुधवारी, ३१ डिसेंबरला सकाळी छाननीला सुरुवात होताच महापालिका परिसरात जणू राजकीय जत्राच भरली होती. अर्जातील तांत्रिक त्रुटींवरून उमेदवारांमध्ये एकमेकांवर तोंडी आणि लेखी आक्षेप घेण्याचे सत्र सुरू होते. आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक, सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील उमेदवारांच्या अर्जावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेत ठाण मांडले होते. निवडणुकीचे काम असल्याने जराही हलगर्जीपणा चालणार नाही या इशाऱ्यामुळे अधिकारी प्रत्येक कागदपत्र दोनदा तपासून निर्णय घेत होते.
पाच अपत्याची तक्रार फेटाळली
प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचे उमेदवार जाकीर खान रसूल खान यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात मुलांच्या संख्येबाबत खोटी माहिती दिल्याची तक्रार माजी उपमहापौर तथा उद्धवसेनेचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. ही तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी फेटाळून लावली आहे. मुदतीत तक्रार न आल्याने ती फेटाळल्याचे गोसावी यांनी सांगितले तर यासंदर्भात आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दुसरीकडे भाजपने उध्दवसेनेच्या एबी फॉर्मवरील डिजिटल सहीच्या संदर्भात केलेल्या तक्रारीवरही कोणताच निर्णय झाला नाही. उध्दवसेनेचे अपवाद वगळता अर्ज मंजूर झाले.
प्रभाग ६ 'अ' मधून भाजपच्या उमेदवार आणि माजी महापौर जयश्री अशोक धांडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या 'एबी' फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याचे छाननी दरम्यान समोर आले, त्यामुळे त्यांचा भाजपचा अधिकृत अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. सुदैवाने, त्यांनी याच प्रभागात अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला होता, तो वैध ठरला आहे. त्यामुळे आता जयश्री धांडे या भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील.
नेत्यांच्या 'पुत्रप्रेमा'पायी निष्ठेचा बळी; अजित पवारांना पत्र
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार) मोठा वाद उभा राहिला आहे. पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी एका माजी मंत्र्यावर आणि बड्या नेत्यावर 'जागांचा सौदा' केल्याचा आणि 'पुत्रप्रेमा'साठी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. अभिषेक पाटील यांनी आपल्या पत्रात आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा, अशा शब्दात त्यांनी स्थानिक नेतृत्वावर तोफ डागली आहे. ज्याला समाजकारणाची आणि राजकारणाची काडीचीही आवड नाही, अशा नेत्याच्या मुलासाठी हक्काची जागा राखून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिळालेल्या जागांचा सौदा करून पक्षाची इभ्रत पणाला लावली. राष्ट्रवादीच्या ३ 'घड्याळ' चिन्हावर भाजपचे चेहरे निवडणूक लढवत असल्याचा दावा करत महानगराध्यक्ष असूनही 'एबी' फॉर्म वाटपाच्या अधिकारापासून वंचित ठेवून पक्षाने अपमान केल्याची भावना व्यक्त केली आहे.