उमेदवार महिलेच्या सासऱ्याला मारहाण; प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दिराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:58 IST2026-01-08T14:32:06+5:302026-01-08T14:58:55+5:30
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना 'या परिसरात प्रचाराला का आले?' असे विचारत उमेदवार महिलेच्या सासऱ्याला प्रतिस्पर्धी ...

उमेदवार महिलेच्या सासऱ्याला मारहाण; प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दिराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना 'या परिसरात प्रचाराला का आले?' असे विचारत उमेदवार महिलेच्या सासऱ्याला प्रतिस्पर्धी उमेदवार महिलेच्या दिराने मारहाण केली. ही घटना बुधवारी (७जानेवारी) सकाळी ११ वाजता चौघुले प्लॉट परिसरात घडली. या प्रकरणी मारहाण करणारा आबा रमेश बाविस्कर (रा. वाल्मीक नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २ 'ब'मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या उमेदवार रेखा भगवान सोनवणे या व त्यांचे पती भगवान उज्ज्वला सोनवणे, सासरे काशिनाथ धोंडू सोनवणे तसेच इतर नातेवाईक बुधवारी प्रचारासाठी चौघुले प्लॉट भागात गेले. त्या वेळी शिंदेसेनेच्या उमेदवार बाविस्कर यांचा दीर आबा रमेश बाविस्कर (रा. वाल्मीक नगर) हा तेथे आला. 'तुम्ही येथे प्रचाराला का आला? तुम्ही येथे प्रचार करू नका,' असे म्हणत त्याने शिवीगाळ करून काशिनाथ सोनवणे यांना मारहाण केली. तसेच 'तू प्रचार केला तर जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली, असे शनिपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये तक्रारदाराने म्हटले आहे.
नणंदेलाही शिवीगाळ
प्रचाराला मज्जाव करीत उमेदवार सोनवणे यांच्या नणंद संगीता वसंत कोळी यांनादेखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी काशिनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आबा बाविस्कर याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांकडे धाव
मारहाणीच्या घटनेनंतर उमेदवाराचे पती भगवान सोनवणे, सासरे काशिनाथ सोनवणे व अन्य मंडळीने थेट पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपबिती कथन केली. त्यावेळी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस अधीक्षकांनी सांगत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.