उमेदवारी नाकारल्याने आमदार भोळेंना घेराव; इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाचा टाहो; हॉटेलमध्ये हायहोल्टेज ड्रामा
By अजय पाटील | Updated: December 30, 2025 15:24 IST2025-12-30T15:19:21+5:302025-12-30T15:24:17+5:30
Jalgaon Municipal Corporation Election: मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. जळगावमध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने आमदार सुरेश भोळे यांना शहरात घेराव घातला. यावेळी पाटील कुटुंबाला रडू कोसळले.

उमेदवारी नाकारल्याने आमदार भोळेंना घेराव; इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाचा टाहो; हॉटेलमध्ये हायहोल्टेज ड्रामा
- अजय पाटील
जळगाव - मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. जळगावमध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने आमदार सुरेश भोळे यांना शहरात घेराव घातला. यावेळी पाटील कुटुंबाला रडू कोसळले, तर प्रश्नांच्या सरबत्तीमुळे विद्यमान आमदार भोळे चांगलेच हतबल झाल्याचे पाहायला मिळाले.
शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस या ठिकाणी ३० डिसेंबर, मंगळवारी दुपारी १२ वाजता महायुतीची बैठक सुरु होती. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्यांना संधी नाकारण्यात आली, अशा कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष या ठिकाणी पहायला मिळाला. प्रभाग क्रमांक १ मध्ये इच्छुक असलेल्या संगीता पाटील यांना उमेदवारी न दिल्यामुळे डावलल्याने त्यांच्या समर्थकांसह कुटुंबाने थेट आमदार सुरेश भोळे यांना गाठले आणि जाब विचारण्यास सुरुवात केली. घेराव घातल्यानंतर संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.
‘आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याशी हक्काने बोलत आहोत, त्याचप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी वरिष्ठांशी का बोलत नाही? आमच्यासाठी त्यांच्याशी भांडण करा, पण आम्हाला न्याय द्या, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी पाटील कुटुंबातील सदस्यांना रडू कोसळल्याने परिसरातील वातावरण भावूक झाले होते. एकीकडे पाटील कुटुंबाचा आक्रोश आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचा दबाव, अशा कात्रीत आमदार सुरेश भोळे अडकल्याचे दिसून आले. कुटुंबाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आमदार भोळे यांची चांगलीच दमछाक झाली.