जळगावात ईव्हीएममधील गोंधळामुळे मतदानाला खोळंबा, सकाळच्या सत्रात मतदारांचा संथ प्रतिसाद
By सुनील पाटील | Updated: January 15, 2026 13:37 IST2026-01-15T13:37:06+5:302026-01-15T13:37:20+5:30
Jalgaon Municipal Corporation Election 2026: महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीच्या काही तासांत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ५.५ टक्के मतदान झाले होते.

जळगावात ईव्हीएममधील गोंधळामुळे मतदानाला खोळंबा, सकाळच्या सत्रात मतदारांचा संथ प्रतिसाद
- सुनील पाटील
जळगाव - महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, सुरुवातीच्या काही तासांत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ५.५ टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत मतदानाचा वेग किंचित वाढला असून, ११.३० वाजेपर्यंत शहरात एकूण १३.३९ टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये ३३,२५७ पुरुष आणि २५,४४१ महिला अशा एकूण ५८,६९८ मतदारांनी आपला हक्क बजावला.
ईव्हीएम मांडणीचा क्रम चुकला
मतदान प्रक्रिया सुरू होत असतानाच उर्दू शाळा क्र. १५ मधील केंद्रावर एक गंभीर प्रकार समोर आला. या केंद्रावर ईव्हीएम मशीनची 'अ, ब, क, ड' अशी असणारी अधिकृत क्रमवारी प्रशासनाकडून चुकून उलट्या क्रमाने लावण्यात आली होती. उमेदवार रवींद्र मोरे यांनी हा प्रकार लक्षात येताच तातडीने आक्षेप नोंदवला. त्यानंतर निवडणूक प्रशासनाने आपली चूक सुधारत मांडणीमध्ये दुरुस्ती केली.
सागर हायस्कूलमध्ये तांत्रिक बिघाड; तासभर खोळंबा
प्रभाग क्र. ५ मधील सागर हायस्कूल (बुथ क्र. ५/२४) येथे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी ११.३० च्या सुमारास मतदान सुरू असताना अचानक ईव्हीएम मशीनचे बटण दाबले जात नव्हते. तत्पूर्वी मशीन धिम्या गतीने चालत असल्याची तक्रार मतदारांनी केली होती. भाजप उमेदवार नितीन लढ्ढा यांचे प्रतिनिधी ॲड. राहुल झंवर यांनी या तांत्रिक बिघाडाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. सुरुवातीला मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी ठरल्याने अखेर दुपारी १२.३० वाजता नवीन मशीन बसवण्यात आले. या सर्व प्रक्रियेत मतदानाचे काम तब्बल एक तास बंद राहिल्याने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.